गणेश चतुर्थीपूर्वी रस्ता सुस्थितीत न झाल्यास भाजप आंदोलन छेडणार
⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील यावर्षीच नव्याने केलेल्या रस्त्याला खड्डे पडले आहेत. त्यामुळे सदर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना खूप त्रास सहन करावा लागतो.नादुरूस्त रस्ता गणेश चतुर्थीपूर्वी सुस्थितीत न झाल्यास व संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाल्यास भाजपा कणकवली तालुक्याच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.
कणकवली तालुका भाजपाचे अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली येथील अधिकाऱ्यांची भेट घेऊन फोंडाघाट रस्त्याचे काम करणारे संबंधित ठेकेदाराविषयी तक्रारीचा पाढा वाचला. यावेळी भाजपचे पदाधिकारी सुभाष मालंडकर, सदानंद चव्हाण लक्ष्मण घाडीगावकर गणेश तळगावकर, उमेश घाडी, सुशील परुळेकर, प्रज्वल वरदम, अभय गावकर, महेश मेस्त्री प्रशांत राणे ,सुदर्शन नाईक, संदीप मेस्त्री, विजय चिंदरकर, सागर राणे, वंचित कदम सिद्धेश तळगावकर स्वप्निल चिंदरकर सौरभ चिंदरकर प्रशांत फाटक, सौरव आचरेकर ,नितीन राणे, प्रदीप कदम, आनंद घाडी, सोहेल खान, सतीश हरमळकर आदी उपस्थित होते.
फोंडाघाट रस्ता मे महिन्यात केलेला रस्ता जून – जुलै मध्येच खड्डे पडून निकृष्ट झाला. एवढे दर्जाहीन काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करा. त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी भाजपाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली.या संदर्भात लेखी निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अधिकारी अजयकुमार सर्वगोड यांना दिले आहे. फोंडाघाट रस्ता हा घाटामधून जात असल्याने पावसाळ्याच्या कालावधीमध्ये धुके पडलेले असते. अशावेळी रस्त्याच्या बाजूला कॅट आय बसविण्यात आलेले नाहीत व थर्मोप्लास्टिक पेंट रोड मार्किंग सुद्धा केलेले नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी सदर नव्याने केलेल्या रस्त्यावरील पडलेल्या खड्यांची चौकशी करून उचित कार्यवाही करण्यात यावी व त्याचे लेखी उत्तर आम्हाला कळवावे. नादुरूस्त रस्ता गणेश चतुर्थीपूर्वी सुस्थितीत न झाल्यास व संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाल्यास भारतीय जनता पार्टी कणकवली तालुक्याच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.
