आप्पारावं घोलकर यांची कार्यपद्धती प्रभावी

निवृत्तीनंतर त्यांनी सहकार क्षेत्रात कार्यरत राहावे: मनीष दळवी यांनी व्यक्त केली भावना

⚡ओरोस ता.२६-: अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे कोकण विभागाचे विभागीय सह निबंधक आप्पाराव घोलकर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर आम्ही सहकारात काम करणारे सर्वजण प्रभावित झालो आहोत. अशा अधिकाऱ्यांच्या निवृत्तीनंतर, त्यांच्या ३३ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतील अनुभवाचा उपयोग महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला व्हावा, म्हणूनच निवृत्तीनंतर पुढच्या काळामध्ये त्यांनी सहकार क्षेत्रामध्येच कार्यरत रहावे, असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी सत्कार कार्यक्रमात बोलताना केले.

कोकण विभागाचे विभागीय सह निबंधक आप्पाराव घोलकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा बँक सभागृहात सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यावेळी मनिष दळवी बोलत होते. यावेळी त्यांनी सहकारी संस्था आणि शेतकरी यांच्या आर्थिक विकासासाठी जिल्हा बँक काम करत असताना घोलकर यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन या पुढील काळात निश्चितपणे लाभो अशी अपेक्षा व्यक्त केली.


या सत्कार समारंभाला उत्तर देताना आप्पाराव घोलकर यांनी, शासकीय सेवेमध्ये वरिष्ठ पदावर काम करीत असताना प्रामाणिकपणे, अभ्यासू वृत्ती ठेवून काम केले तर त्या कामाचे निश्चितपणे समाधान मिळते आणि या आत्मिक समाधानाचे मोल निश्चितपणे फार मोठे असते. कायद्याच्या तरतुदी, शासन निर्णय, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना व नियमात केलेल्या कामाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येते आणि असं काम करत असताना त्याचे बारकावे समजतात, असेही ते म्हणाले.
सुरुवातीला बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी प्रास्तविक केले. तर जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक गजानन गावडे यांनी आपल्या मनोगतात आप्पाराव घोलकर यांच्या बद्दलच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी उपविभागीय निबंधक श्री.देशपांडे, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक अजय थुटे, जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे, सहा. निबंधक श्री.धुळप जिल्हा लेखा परिक्षक शेणगांवकर, बँकेचे व सहकार क्षेत्रातील विविध संस्थाच्या वतीने घोलकर यांना पुष्पगुच्छ देउन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी तसेच सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page