⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला नगरपरिषद आणि मुंबई विद्यापीठ उपपरिसर सिंधुदुर्ग, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला शहरातील कातकरी समुदायातील महिला व बालक यांचे ‘लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम कायदा २०१२‘ (पोक्सो कायदा) या कायद्याची जनजागृती व्हावी व त्यास कोणीही बळी पडू नये या हेतूने २६ ऑगस्ट रोजी नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह येथे दुपारी ३ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कातकरी समाजातील महिला व मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे व लोकाभिमुख शिक्षण घेणे, महिलांचा नवीन बचत गट स्थापन करणे त्याचबरोबर विविध प्रशिक्षणे देणे या उद्दात हेतूने नगरपरिषद मार्फत कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठ उपपरिसर सिंधुदुर्ग, सावंतवाडीच्या प्रा.माया राहाटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. तरी कातकरी समाजातील जास्तीत जास्त महिला व बालकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.
