दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न व समस्यांबाबत चर्चा
*💫कणकवली दि.०४-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची प्रहार दिव्यांग शासकिय व निमशासकीय अधिकारी – कर्मचारी संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न व समस्या याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी संघटनेच्या वतीने दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या मागण्याही नूतन सीईओं समोर मांडण्यात आल्या. शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक उपकरणे उपलब्ध करुन देण्यात यावीत. दिव्यांग कर्मचारी यांची स्वतंत्र सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करुन पदोन्नतीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्यात यावी. शासन निर्णयानुसार दिव्यांग कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यालयात उपस्थित राहण्यास अर्धा तास सवलत असलेबाबतचा आदेश सर्व खाते प्रमुखांना देण्यात यावा. दिव्यांग कर्मचारी यांचा प्रलंबित वाहन भत्ता त्वरीत मंजूर करण्यात यावा. दिव्यांग अधिनियम 2016 चा जाहिरनामा प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागावर प्रसिध्द करण्यात यावा आदी मागण्या प्राधान्याने मांडण्यात आल्या. संघटनेची अधिकृत सभा आयोजित करून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संघटनेला दिले. संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री. संतोष कांबळे, सहसचिव श्री. रणजित दळवी, उपाध्यक्ष श्री. उमाकांत होनराव , कोषाध्यक्ष श्री. रामचंद्र लांबर, कुडाळ तालुकाध्यक्ष श्री. राजेश राठोड व सदस्य श्री. अनिल कदम आदी उपस्थित होते.
