भाई चव्हाण:वायंगणी शेतीत वालयची लागवड करावी
⚡कणकवली ता.१०-: कोकणातील भातशेतीतील पारंपारिक बियाणे असलेल्या वालय या भातशेतीकडे बहुतांश शेतकर्यांनी पाठ फिरवली आहे. वालय भात हे पेजेच्या तांदळासाठी आणि गावठी पोह्यासाठी उत्तम मानले जाते. मात्र हे भातच अल्प प्रमाणात उपलब्ध होत असल्याने सद्या पेजचे तांदूळ आणि पोह्याचे अक्षरशः रेशनिंग सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर किमान येत्या वायंगणी भातशेती हंगामात कोकणातील शेतकर्यांनी वालय भाताची लागवड करावी, असे आवाहन आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण प्रदेशाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
कोकणातील शेतकरी गेल्या काही वर्षांत कमी कालावधीत भरपूर उत्पन्न देणार्या संकरित वाणाच्या भातशेतीकडे वळला आहे. मात्र या तांदळामध्ये पोषण मुल्ये कमी असतात हे आता सिद्ध झाले आहे, अशी माहिती देऊन चव्हाण म्हणाले, वालय या पारंपारिक बियाण्याच्या भातापासूनच चांगल्या दर्जाचे, चवीचे पोषण मुल्य असलेले पेजेचे तांदूळ आणि गावठी पोहे तयार होतात. मात्र शेतकऱ्यानी गेल्या काही वर्षांत या भातशेतीकडे शेतकर्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सद्या राईस मिलवाल्यांसह पोहे मिल मालकांना वालयचे भातच उपलब्ध करण्यासाठी नाकीनऊ येत आहेत. परिणामी पेजेचे तांदूळ आणि पोह्याचे दर गेल्या काही महिन्यांत दिडपटीहून अधिक वाढले आहेत.
सद्या भात लावणीचा हंगाम सुरू आहे. या कालावधीत शेतकरी कुटुंबातील काहींना हमखास सर्दी पडसे, अंगदुखी, मोडे असे पावसाळी आजार होतात. या आजारांवर उकड्या वालय तांदळाची पेज हा उत्तम उपाय मानला जातो. लाल गावठी पोहे हे पोषण मुल्यासाठी भाताच्या तुसासह तयार केले जातात. मात्र या भाताचाच तुटवडा असल्याने व्यापार्यांनी तांदूळ आणि पोह्याचे रेशनिंग सुरू केले आहे. ग्राहकांना अर्धा किलोपेक्षा जास्त तांदूळ, पोहे दिले जात नाहीत, अशी माहिती देऊन चव्हाण यांनी आगामी वायंगणी हंगामात या वालय भातशेतीची कास धरायला हवी. दरही चांगला मिळत आहे.
