महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या मालवणात मूकमोर्चा

राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचा मोर्चाला पाठिंबा

⚡मालवण ता.०३-: मणिपूर येथे घडलेली महिलांवरील अत्याचाराची घटना मानवजातीला लांच्छनास्पद असून मणिपूरसह देशात इतरत्र होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराविरोधात प्रत्येकाच्या मनातील खदखद व्यक्त करण्यासाठी व या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी मालवण शहरात मालवणवासियांतर्फे दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. शांतीसागर मैदान, देऊळवाडा मालवण ते तहसील कार्यालय असा मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. या मूकमोर्चाला राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवीला आहे.

या निषेध मूकमोर्चात संविधानप्रेमी भारतीयांनी काळे कपडे परिधान करून सहभागी व्हावे, असे आवाहन नितीन वाळके, चारू देऊलकर, रुजारिओ पिंटो, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, सिद्धार्थ जाधव, डॉ. गार्गी ओरसकर, गौरव ओरसकर, स्वाती पारकर, सरदार ताजर, उषा यमकर, महेश काळसेकर व इतर मालवण वासियांनी केले आहे.

या मूक मोर्चाला मालवण वासिय तसेच इतरांकडून मोठा पाठिंबा मिळाला आहे. राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या राजकीय पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शवत मोर्चात आपले कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच अमन के साथी, आम्ही मालवणी, फुले शाहू आंबेडकर विचारमंच मालवण, विवेकाचे व्यासपीठ, दक्ष युवक भारत संघटना, युथ बिट्स फॉर क्लायमेट, आम्ही भारतीय अशा विविध सामाजिक संघटनानी देखील या मोर्चाला आपला पाठिंबा दिला आहे.

You cannot copy content of this page