लक्ष्मण तेली व परशुराम झगडे यांनी दिले उत्तर
⚡कणकवली ता.०२-: स्वतःची राजकीय पोळी भाजत वरिष्ठांना खुश करण्यासाठी आरिफ बगदादी यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. अशा बेजबाबदार वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे अशी वक्तव्य केल्यास ती सहन केली जाणार नाहीत असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण तेली व सचिव परशुराम झगडे यांनी दिला आहे.
स्वतःची राजकीय पात्रता सिद्ध करण्यासाठी कोणत्याही जातीला हीन लेखणे हे निषेधार्ह आहे. श्री बगदादी यांनी आपली पात्रता दाखविताना ज्या म्हणीचा उल्लेख केला आहे. त्याच जातीचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा तेली समाजाचे असून त्यांनी आपली राजकीय सामाजिक पात्रता आणि प्रतिष्ठा यापूर्वी सिद्ध करून दाखविली आहे.
राजकीय मंडळींनी कोणती वक्तव्य करावी याबाबत आमचे काहीही म्हणणे नाही. मात्र हे करत असताना कोणत्याही जातीला हीन लेखून स्वतःची पात्रता सिद्ध करण्याचा केलेला प्रयत्न हा निषेधार्ह आहे. यापुढे राजकीय मंडळींनी अशी वक्तव्य करताना म्हणीचा आधार घेत जातीला हीन लेखनाचा प्रयत्न केल्यास ते सहन केले जाणार नाही.
