अन्यथा १५ ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण:राधाकृष्ण गोलतकर यांचे जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन
⚡ओरोस ता.०१-: वेंगुर्ला तालुक्यातील तुळस खरीवाडी येथे सुरू असलेल्या उद्भव विहिरीचे काम तांत्रिक दुष्ट्या योग्य नसल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता उदयकुमार महाजनी यांनी स्पष्ट केलेले असताना सबंधित ठेकेदारावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे तुळस ग्रामपंचायत सह सर्वांची चौकशी होवून सबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर नियमानुसार कारवाई तात्काळ न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद समोर उपोषण करण्याचा इशारा येथील ग्रामस्थ राधाकृष्ण गोलतकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले आहे. या निवेदनात तुळस गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामे चुकीच्या पद्धतीने होत असल्याबाबत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे रीतसर अर्ज करून याबाबतची तक्रार केली होती. त्यानंतर विभागाचे कार्यकारी अभियंता महाजनी यांनी जलजिवन मिशन योजनेतील विहिरीचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे निदान करीत हे काम नव्याने माप दंडानुसार करण्याचे आदेश दिले होते.
कार्यकारी अभियंता यांनी दिलेले आदेश धाब्यावर बसवत स्थानिक अधिकाऱ्यांशी संगनमत करून या कामाचे ठेकेदार त्या विहिरीचे काम रेटून नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे तुळस ग्राम पंचायती सह सबंधित सर्व अधिकाऱ्यांची चौकशी होवून बेजबाबदारपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर होवून १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत आम्हाला न्याय मिळावा. अन्यथा १५ ऑगस्ट रोजी ग्रामस्थांसह जिल्हा परिषद समोर बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असे नमूद केले आहे.
