युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण काळाची गरज – पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे

⚡मालवण ता.२८-: युवतींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून आयोजित केलेला स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा उपक्रम स्तुत्य आहे. याचा लाभ युवतीनी घेऊन संकटाच्या वेळी स्वतःचे रक्षण करावे असे प्रतिपादन मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी केले.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम कट्टा येथील कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा, डॉक्टर दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील इ.आठवी ते पदवी पर्यंतच्या २५० विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटन मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय नाईक यांनी केले.

या कार्यक्रमात डॉ. शुभांगी जोशी यांनी उपस्थित विद्यार्थिनींना, महिला व युवतींवरील होणाऱ्या अत्याचाराबाबत विविध दाखले देत समर्पक विवेचन करून अत्याचाराबाबत असणारी दाहकता व सर्वांनी घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तर पोलीस उपनिरीक्षक प्रज्ञा खोत यांनी यावेळी पोक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थिनींनी सजग राहणे किती गरजेचे आहे याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांचा संस्था सचिव सुनील नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका स्नेहल गावडे यांनी विशेष असे प्रयत्न केले. त्यांच्या सोबत सहाय्यक संरक्षण अधिकारी मेघा वजराटकर याही उपस्थित होत्या. यावेळी संस्था सचिव सुनील नाईक विजयश्री देसाई ,मुख्याध्यापक संजय नाईक, ऋषी नाईक, प्रभारी प्राचार्य रविंद्र गावडे , पर्यवेक्षिका देवयानी गावडे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय पेंडूरकर यांनी केले तर आभार स्नेहल गावडे यांनी मानले.

You cannot copy content of this page