मालवणात संतप्त शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक
⚡मालवण ता.२७-: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी मालवण तालुक्यातून २०२० पासून सुमारे ३ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले असताना अनेक अर्ज कोणतेही कारण न देता रिजेक्ट होऊन उर्वरित अर्ज मंजुरीबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने आज मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी मालवण तहसील कार्यालयात धाव घेत तहसीलदार वर्षा झाल्टे यांना जाब विचारला. तहसील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या व वेळकाढू कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप यावेळी करून पात्र लाभार्थ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका उपस्थित बाबू टेंबुलकर व अन्य शेतकरी यांनी मांडली.
दरम्यान, याबाबत महसूल सप्ताह अंतर्गत गावागावात शिबीर घेऊन रिजेक्ट झालेले अर्ज व प्रलंबित अर्ज याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी शेतकऱ्यांना दिले.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी दाखल केलेल्या अर्जाबाबत आज मालवण तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी आज तहसीलदार वर्षा झालटे यांची भेट घेतली. यावेळी मालवणच्या माजी नगरसेविका पूजा करलकर, सुकळवाड तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव मसुरकर, बाळा टेंबुलकर, कट्टा ग्रा.पं. सदस्य बाबू टेंबुलकर, अजय मयेकर, उमेश पाताडे, विनायक मयेकर, सरपंच युवराज गरुड, स्वप्नील गावडे, अल्का पाटकर, लक्ष्मण हडकर, सखाराम गावडे, गजानन परब यांसह कट्टा, सावरवाड, पेंडूर, हेदुळ, खोटले, डीकवल, आचरा, चौके, आंबेरी, साळेल, मसुरे, आचरा, सुकळवाड येथील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांनी आपला प्रश्न मांडताना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी शेतकरी मागील दोन वर्षे तहसील कार्यालयाचे उंबरे झिजवत आहेत. ऑनलाईन भरलेले अनेकांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत. तर काही अर्ज अद्याप मंजूर झालेले नाही. अर्ज नाकारण्याचे कारण समजावे यासाठी आम्ही सातत्याने तहसील कार्यालयात चौकशीसाठी येत असताना याबाबत संबंधित कर्मचारी टोलवाटोलवीची उत्तरे देण्यापलिकडे काही करत नाहीत, अशी नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तरी याप्रश्नी लक्ष घालून मागील तीन वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी तहसीलदार झाल्टे यांच्याकडे केली.
तर २०२० पासून सुमारे अर्ज भरणा केलेल्या शेतकऱ्यांना सर्व कागदपत्रे योग्य असूनही मंजुरी मिळत नाही. शेतकऱ्यांना सतत तहसील कार्यालयात यावे लागते. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका पूजा करलकर, बाबू टेंबुलकर, मसुरकर यांनी मांडली.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना तसेच शेतकऱ्यांचे अन्य प्रश्न सोडवण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गावागावात महसूल, महाईसेवा केंद्र व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर आयोजित केले जाणार असून यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुका प्रशासन प्रयत्नशील असल्याचे तहसीलदार वर्षा झालटे यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी मालवण प्रांताधिकारी स्वाती देसाई, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे उपस्थित होते.
दरम्यान, गावात कोणत्या दिवशी कॅम्प लावले जाणार आहेत त्यांची माहिती शेतकऱ्यांना अगोदर द्या, म्हणजे शेतकऱ्यांना त्याठिकाणी वेळेत उपस्थित राहावे सोईस्कर ठरेल, असे बाबू टेंबुलकर यांनी सांगितले.
