⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी तालुक्यात पावसाचे थैमान सुरूच आहे. गुरुवारी सकाळपासून मुसळधार पावसाने झोडपले असून लहान मोठ्या पडझडीच्या घटना घडत आहेत. पत्रकार शैलेश मयेकर यांच्या
सावंतवाडी खासकीलवाडा गोठण येथील घराची भिंत कोसळली. त्यामुळे घराचे मोठे नुकसान झाले. त्यातच ही भिंत लगतच असलेल्या संरक्षक भिंतीवर कोसळल्यामुळे संरक्षक भिंत देखील तुटून पडली. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी घरात कोणीही नसल्यामुळे अनर्थ टळला.
पावसामूळे या घराची भिंत भिजल्याने कोसळली तसेच छप्पराचा काही भागही कोसळला. अन्य घरही धोकादायक स्थितीत असल्याने सध्या अतिवृष्टीच्या काळात घरात थांबणेही धोकादायक बनले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी पोलिसांसमवेत जाऊन पाहणी केली. तसेच महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घराची पाहणी केली. सामाजिक बांधिलकी संघटनेचे रवी जाधव तसेच सतीश बागवे यांनीही भेट देत पाहणी केली.
त्यानंतर सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, जिल्हा सोशल मीडिया संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, नरेंद देशपांडे, राजू तावडे, सचिन रेडकर, विनायक गांवस, भुवन नाईक नितेश देसाई निखिल माळकर आदींनीही भेट देत त्यांना आधार दिला.
