⚡मालवण ता.१३-: मालवण तालुक्यातील विरण- पोईप पुलाखाली काही दिवसांपूर्वी आढळलेल्या बेवारस मृतदेहाची ओळख पटली असून मृत व्यक्तीचे नाव मनोज प्रल्हाद मोरे (मुंबई) असे आहे. मात्र त्याच्या आधारकार्ड वरील पत्त्यानुसार शोध घेतला असता त्याठिकाणी ही व्यक्ती राहत नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या व्यक्ती विषयी किंवा त्याच्या नातेवाईकांविषयी कोणास माहिती असल्यास त्यांनी मालवण पोलीस ठाणे किंवा मसुरे पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
विरण पोईप पुलाखाली पाण्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह ८ जुलै रोजी आढळून आला होता. स्थानिक पोलीस पाटील निनाद माळी यांनी याची माहिती मालवण पोलीस ठाण्यास दिली होती. मृतदेहा जवळ सापडलेल्या आधारकार्डवर नाव मनोज प्रल्हाद मोरे वय ३६ रा. सबेस्टियन, जे. डि. सिल्वहाचाळ संतोषी माता रोड, धोबी घाट जवळ दहिसर पश्चिम मुंबई असा पत्ता आढळून आला. आधारकार्ड वरील पत्त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता त्या पत्त्यावर अशी कोणीही व्यक्ती राहत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे या व्यक्ती विषयी त्याचे कोणीही नातेवाईक, अगर मित्रपरिवार मिळून आल्यास अथवा आपल्या ठिकाणी कोणी बेपत्ता असल्यास त्याचे नाव व नातेवाईकांचे नाव, संपर्क क्रमांक मालवण पोलिसांना कळवावे. तसेच छायाचित्रातील मयत व्यक्ती कोणाच्या परिचयाची असेल तर त्वरित पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे- ९७६७७००५०१, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद नाईक- ९४०४४४७३७५ पोलीस कॉन्स्टेबल विजय फरांदे-८२७५६९६०५६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
