⚡बांदा ता.१३-: कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून गेली ११ वर्षे सिंधुदुर्ग, रायगड ,नाशिक, पालघर ,बीड, रत्नागिरी, ठाणे , पुणे जिल्ह्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक विविध कार्यक्रम तसेच ग्रामीण भागातील महिलांना अर्थाजनाचे साधन निर्माण व्हावे यासाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षणे आयोजित केली जातात .
विविध सामाजिक उपक्रम करत असताना ज्या गरजू मुलांना शिकण्याची इच्छा आहे मात्र आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा हजारो मुलांना कोकण संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य म्हणून दफ्तर,कंपास पेटी व वह्या वाटप केले जाते. १३ जूलै २०२३ रोजी मुळशी तालुक्यातील छत्रपती शिवाजी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज मुळशी या प्रशालेत शिकणाऱ्या ४० गरजू व हुशार मुलांना कोकण संस्था आणि सिंक्रो डिजिटल यांच्या वतीने दफ्तर व वह्या वाटप करण्यात आल्या.
या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाच्या वेळी कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, प्रकल्प व्यवस्थापक प्रीती पांगे, सामाजिक कार्यकर्ते नामदेव गवस, मुख्याध्यापक संतोष भोकरे, संस्था पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते, स्कुल किट वाटप केल्याबद्दल प्रशालेच्या शिक्षकांनी कोकण संस्थेचे आभार मानले व संस्थेच्या पुढील उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
