शाळेत धडक देत विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांना धरले धारेवर
बांदा/प्रतिनिधी
शहरातील निमजगा येथील जिल्हा परिषदेची शाळा इमारत हि मोडकळीस आली असून केव्हावी कोसळण्याच्या स्थितीत आहे. जीर्ण इमारतीमुळे मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने आज शिवसेनेचे सावंतवाडी तालुका अल्पसंख्याक उपाध्यक्ष रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व पालक यांनी शाळेत धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर व केंद्रप्रमुख संदीप गवस यांनी शाळेच्या इमारतीचे निरलेखन झाले असून येत्या आठ दिवसात काम सुरु होणार असल्याचे आश्वासन दिले.
निमजगा पूर्ण प्राथमिक शाळेत सद्यास्थितीत ४० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या मुख्य इमारतीचे छप्पर व इमारत हि जीर्ण झाल्याने ठिकठिकाणी मोडकळीस आली आहे. अनेक ठिकाणी कौलारू छप्पर कोसळले आहे. शाळेच्या मधल्या सुट्टीत मुले याठिकाणी खेळत असल्याने इमारत कोसळून दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न खान यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच लवकरात लवकर शाळेचे काम न केल्यास शाळा बंद करण्याचा ईशारा दिला. यावेळी निवेदन देण्यात आले.
यावेळी मंथन गवस, संजय आईर, अमोल धुरी, रामदास सावंत, राजा खान, धर्मा राठोड, बाबुराव शेटकर, मोहसीन खान, उमेश शेटकर, सुभाष नाईक, संदेश उरूमकर, मुख्याध्यापक प्राजक्ता राऊळ आदी उपस्थित होते.
कोट :-
आतापर्यंत जीर्ण इमारतीच्या निरलेखनसाठी पाच वेळा शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत ठराव घेण्यात आला आहे. प्रस्ताव शासन दरबारी मंजूर झाला असून येत्या आठ दिवसात काम सुरु होणार आहे. यासाठी पालक व स्थानिकांनी सहकार्य करावे.
— दुर्वा साळगावकर, विस्तार अधिकारी
कोट :-
शाळेची इमारत धोकादायक बनली असून याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होणार आहे. मडुरा येथे शाळेचे छप्पर कोसळण्याची घटना घडल्याने प्रशासन याठिकाणी कोणत्या दुर्घटनेची वाट पाहत आहे. मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा शाळा बंद आंदोलन छेडावे लागेल.
— रियाज खान, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष शिवसेना अल्पसंख्यांक सेल
