मच्छी विक्रेत्या महिलांच्या नुकसान प्रकरणातील दोषींवर कारवाई करा…

अन्यथा आमरण उपोषण छेडणार;स्नेहा केरकर यांचा इशारा

⚡मालवण ता.११-: कट्टा येथे मच्छी विक्रेत्या महिलांच्या माशांवर विषारी द्रव्य टाकून नुकसान करण्याच्या घटनेची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा २० जुलै रोजी मालवण पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषणास बसू, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक विविध सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्नेहा जितेंद्र केरकर यांनी मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांना दिला आहे.

काही दिवसांपूर्वी कट्टा येथे मत्स्य विक्रेत्या महिलांच्या विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या माशांवर फिनेल, मुंग्याची पावडर, ब्लिचिंग पावडर टाकून नासाडी करण्यात आली. या प्रकारामुळे मच्छी विक्रेत्या महिलांचे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबत आज सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक विविध सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्नेहा जितेंद्र केरकर यांनी मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची भेट घेऊन चर्चा करत निवेदन सादर केले. यावेळी हिरांगणी केळूसकर, संध्या गोवेकर, राजलक्ष्मी शिरोडकर व इतर संस्था सदस्य महिला उपस्थित होत्या.

माशांवर विषारी द्रव्य टाकून नुकसान करण्यासारखे समाज विघातक कृत्य करणाऱ्यांचा तात्काळ शोध घेऊन कारवाई करावी तसेच नुकसान ग्रस्त महिलांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी स्नेहा केरकर यांनी निवेदनात केली आहे. येत्या ८ दिवसात याबाबत कारवाई न झाल्यास २० जुलै रोजी संस्थेमार्फत आपण स्वतः मालवण पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषणास बसू, असा इशारा स्नेहा केरकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page