मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील रोझरी इंग्लिश स्कूलचा रौप्यमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा काल विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे औचित्य साधून प्रशालेच्या नूतन इमारतीचे उदघाटन धर्मगुरू ऑल्विन बरेटो यांच्या हस्ते करण्यात आले. सांगता सोहळ्यास प्रमुख अतिथी फादर म्यॅन्युअल डिसिल्व्हा, रोझरी इंग्लिश स्कूलचे व्यवस्थापक फादर रिचर्ड सालढाणा, फादर के. मरियादास यांच्यासह जिल्ह्यातील अन्य फादर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात धार्मिक प्रार्थनेने झाली. त्यांनतर दीपप्रज्वलनाने रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाची सुरवात झाली. फादर डिसिल्व्हा म्हणाले, फादर गॅब्रिएल डिसिल्व्हा यांनी लावलेल्या लहानशा रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. कोरोना काळातही शिक्षकांनी आपल्या अपार मेहनतीने ऑनलाईन पद्धतीने मुलांपर्यंत शिक्षणाचा प्रवास कायम ठेवत अनेक उपक्रम राबवले असे सांगत त्यांनी शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुलांच्या रंगतदार नृत्य प्रदर्शनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली तर पालकांच्या धमाकेदार नृत्याने तर प्रेक्षकांच्या टाळ्यांची वाहवा मिळवली. त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व आजपर्यंतच्या सर्व सोळा वर्षाच्या कारकिर्दीतील बोर्डाच्या परीक्षेत अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. शाळेत १० वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलेल्या शिक्षकांनाही सन्मानित करण्यात आले. रौप्य महोत्सवानिमित्त शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यातील विजेत्या स्पर्धकांना व परीक्षकांना ही गौरवण्यात आले. कार्यक्रम उत्साहात व कोरोनाच्या सर्व मार्गदर्शन सूचनांचे पालन करत पार पडला. सूत्रसंचालन सह शिक्षिका मारिया फर्नांडिस व लतिका न्हिवेकर यांनी केले. सह शिक्षिका साधना मसुरकर यांनी आभार मानले. फोटो रोझरी इंग्लिश स्कूलच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सोहळ्याचे उदघाटन धर्मगुरू ऑल्विन बरेटो यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
*रोझरी इंग्लिश स्कूलचा रौप्यमहोत्सवी सांगता सोहळा उत्साहात संपन्न*
