*💫मालवण दि.२८-:* अहमदनगर येथे पार पडलेल्या राज्य शूटिंगबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या १७ वर्षाखालील व १९ वर्षाखालील संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत निवड समितीचे लक्ष वेधले. या स्पर्धेतून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या १७ वर्षाखालील संघातून पारस गावकर (विजयदुर्ग), मयुरेश गावडे (वेताळ-बांबर्डे) तर १९ वर्षाखालील संघातून ऋत्विक नेमण (मातोंड), समीर तळवडकर (मोर्वे), आदित्य साळगावकर (सावंतवाडी) या पाच खेळाडूंची राज्य शूटिंग बॉल संघात निवड झाली असून राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत ते राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. अहमदनगर येथे २० व २१ फेब्रुवारी रोजी ३४ वी राज्य शूटिंग बॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा संपन्न झाली. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे १७ वर्षाखालील व १९ वर्षाखालील असे दोन संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत सिंधुदुर्ग च्या १९ वर्षाखालील मुलांनी प्रदर्शनीय सामन्यात जळगाव संघाचा पराभव केला तर स्पर्धेत गटातील औरंगाबाद आणि धुळे संघाला नमवून पुढे उपउपांत्य फेरीत लातूर संघाचा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली मात्र उपांत्य सामन्यात जळगाव संघा बरोबर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात सिंधुदुर्गच्या संघाला १९-२१ अशी हार पत्करावी लागली. या संघातून ऋत्विक नेमण, समीर तळवडकर यांनी उत्तम खेळ साकारला त्यांना वसंत परब, आदित्य साळगावकर, रमेश बांबर्डेकर, केशव सावंत, अखिल ठाकूर, यांची उत्तम साथ लाभली. तर १७ वर्षाखालील संघाने औरंगाबाद व अहमदनगर संघाला नमवून उपांत्य फेरी गाठली परंतु उपांत्य सामन्यात सिंधुदुर्गला जालना संघाकडून हार पत्करावी लागली. या संघातून कर्णधार पारस गावकर व मयुरेश गावकर यांनी उत्तम खेळ केला त्यांना तेजस ठाकूर, तुषार सावंत, गौरेश घाडी, मयुरेश गावडे, सिद्धेश गावडे, दर्पण परब, अनिकेत धुरत, निखिल गावडे आदी खेळाडूंची चांगली साथ लाभली. या दोन्ही संघांना प्रशिक्षक म्हणून प्रमोद मोहिते, व्यवस्थापक अरविंद साळगावकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेतून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या १७ वर्षाखालील संघातून पारस गावकर व मयुरेश गावडे तर १९ वर्षाखालील संघातून ऋत्विक नेमण, समीर तळवडकर, आदित्य साळगावकर या पाच खेळाडूंची राज्य शूटिंग बॉल संघात निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशनच्या पदाधिकारी, शूटिंग बॉल खेळाडू व मान्यवरांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राज्य शूटिंगबॉल संघात सिंधुदुर्गच्या पाच खेळाडूंची निवड….
