⚡बांदा ता.११-: भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई ॲडव्हान्स या परीक्षेत तन्वी प्रशांत बांदेकर हिने उज्वल यश संपादक केल्याबद्दल गोगटे वाळके महाविद्यालय बांदाच्या शिक्षकशिक्षकेतर कर्मचार्यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष श्रीयुत डी.बी. वारंग, सहसचिव डी. एस. पणशीकर, खजिनदार टी. एन. शेटकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करण्यात आला.
तन्वी बांदेकर हिने सदर परीक्षेत सिंधुदुर्गात प्रथम येण्याचा मान पटकावला तर संपूर्ण भारतात१७७३ या क्रमांकाची रँक तिने प्राप्त केली. या परीक्षेसाठी दरवर्षी हजारो विद्यार्थी आपले बुद्धिमत्ता पणाला लावत असतात त्यामध्ये तन्वी बांदेकर हिने हे यश प्राप्त केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल शिर्के यांनी केले जेईई परीक्षा देशभरात किती महत्त्वाची आहे याविषयी त्यांनी विवेचन केले. तन्वी बांदेकरला शुभेच्छा देताना प्राचाय काजरेकर म्हणाले की तिने प्राप्त केलेले यश सातत्यपूर्णतेने टिकवणे आवश्यक आहे. संयमी समतोल विचार करत येणारी आव्हाने पेरली पाहिजेत. तिच्या यशाबद्दल कौतुक करताना शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष डी. बी. वारंग म्हणाले की तन्वीने घेतलेल्या ज्ञानाचा वापर सामाजिक उन्नतीसाठी समाजासाठी करावा. स्पर्धात्मक युगात स्वतःला शोधणे महत्त्वाचे आहे. आपल्या परंपरा व घेतलेले ज्ञान सक्षम नेतृत्व उभे करण्यासाठी कामी येईल. यावेळी प्रा. वेल्हाळ यांनीही तिला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.डी कार्वेकर यांनी केले तर आभार प्रा. उमेश परब यांनी मानले.
