आरोस विद्याविकास हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची व्यथा:परतीच्या प्रवासावेळी बस सोडण्याची मागणी
बांदा/प्रतिनिधी
आरोस येथील विद्याविकास हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनींना सायंकाळी परतीच्या प्रवासावेळी वेळेत बस नसल्याने, या विद्यार्थिनींना दररोज तीन ते चार किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याची व्यथा या चिमुकल्या विद्यार्थिनींनी पत्रकार संरक्षण समितीचे सिंधुदुर्ग सहखजिनदार मदन मुरकर यांच्याकडे मांडताच पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने वेंगुर्ला बस स्थानकप्रमुख विशाल निवृत्ती शेवाळे यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे बांदा वरून सुटणारी बांदा -शिरोडा बसफेरी दररोज सायंकाळी कोंडुरा तीठा येथून शाळा सुटण्याच्या वेळेपूर्वी लवकर जात असल्याने व या बस नंतर विद्यार्थांना दुसरी बस वेळेत नसल्याने नाईलाजाने त्यांना कोंडुरा तिठा ते मळेवाड हे सुमारे तीन ते चार किलोमीटरचे अंतर पायी प्रवास करत पार पाडावे लागते. तरी ही बांदा- शिरोडा बसफेरी कोंडुरा तीठा येथे सायंकाळी ४:४० वाजेपर्यंत पोहोचेल, अशा सुधारित वेळेत सोडण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी वेंगुर्ले स्थानक प्रमुख श्री शेवाळे यांनी निवेदनाची दखल घेत ही बसफेरी उशिराने सुरू करण्याची ग्वाही दिली.
यावेळी पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्राचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रसाद मडगावकर, जिल्हा संघटक जाफर शेख, जिल्हा उपखजिनदार मदन मुरकर, जिल्हा सदस्या सिमंतीनी मयेकर, पत्रकार सुशांत पोवार, दिनेश मयेकर आदी उपस्थित होते.
