संस्कृत विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन सत्कार

⚡मालवण ता.०६-: नगर वाचन मंदिर, मालवण व डॉ. नारिंग्रेकर कुटुंबिय ट्रस्ट यांच्यावतीने मालवण तालुक्यातील दहावीच्या केंद्रातून सेमी इंग्लिश माध्यमात संपुर्ण संस्कृत विषय घेऊन प्रथम चार विद्यार्थी व चार विद्यार्थीनींचा शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला.

नगर वाचन मंदिरच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी संस्थेचे कार्यवाह नागेश कदम यांनी शिष्यवृत्ती उपक्रमाची माहिती दिली. तर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व श्री देवी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्यवाह नागेश कदम, प्रमुख अतिथी डॉ. सुभाष दिघे व देणगीदार श्री. विजय नारिंग्रेकर यांच्या भगिनी सौ. सुलभा नारिंग्रेकर आदी उपस्थित होते.

यावेळी प्रथम क्र.- धनश्री सखाराम शेटवे, हितेश आनंद मालंडकर रू. १०,०००/-, व्दितीय क्र.- वैभवी विद्याधर मेस्त्री, श्रेयस बंडू राठोड रू. ५,०००/-, तृतीय क्र.- सानिया संदिप आजगावकर, यश मिलींद कदम रू.३,०००/-, चतुर्थ क्र. -एंजल मंगेश गोसावी आणि हरिओम संजय प्रसाद रू. २,०००/- या विद्यार्थी विद्यार्थीनींना शिष्यवृत्तीचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. सुभाष दिघे यांनी वाचन संस्कृतीचे महत्व अधोरेखित करत पुरस्कारप्राप्त मुलामुलींनी संस्कृत भाषेला या पुढेही उपयोगात आणावे आणि संस्कृत भाषेचा प्रसार करावा, असे सांगितले. सौ. सुलभा नारिंग्रेकर यांनी पुरस्कारप्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. पालक प्रतिनिधी म्हणून बंडु – राठोड यांनी संस्थेच्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. सौ. अन्वेशा कदम यांनी आपण संस्कृत भाषा शिकवित असल्याचे सांगून या भाषेचे ज्ञान गरजू विद्यार्थ्यांना देण्याबाबत प्रयत्नशील राहू, असे सांगितले. सौ. ज्योती तोरसकर यांनी हा उपक्रम अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने आपले विचार मांडले व संस्थेच्या या उपक्रमाबाबत शुभेच्छा व्यक्त केल्या.

पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांच्यावतीने धनश्री शेटवे हिने संस्थेचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रंथपाल संजय शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रेया चव्हाण, प्रतिभा पेडणेकर, रमाकांत जाधव यांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page