पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे;गाबीत समाज पदाधिकाऱ्यांनी वेधले लक्ष
⚡मालवण ता.०५-;
कट्टा येथे मत्स्य विक्रेत्या महिलांच्या माशांमध्ये विषारी द्रव्य टाकण्याचा झालेला प्रकार अतिशय गंभीर असून याबाबत गाबीत व मच्छिमार समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकाराचा लवकरात लवकर छडा लावून असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी गाबीत समाजाच्या पदाधिकाऱ्यांकाडून मालवणचे नूतन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्याकडे करण्यात आली.
दरम्यान, कट्टा येथे घडलेला प्रकार विकृत असाच असून यातील दोषींवर कारवाई होणार, असे यावेळी पोलीस निरीक्षक श्री. कोल्हे यांनी सांगितले.
चार दिवसापूर्वी कट्टा येथे मत्स्य विक्रेत्या महिलांनी साठवणूक करून ठेवलेल्या माशांमध्ये फिनेल, मुंग्याची पावडर, ब्लिचिंग पावडर असे विषारी द्रव्य टाकून माशांची नासाडी करण्यात आली होती. यामुळे या महिलांचे सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या प्रकारानंतर गाबीत समाज व मच्छिमार संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. तसेच गाबीत समाज व मच्छिमार संघटना पदाधिकारी यांनी कट्टा येथे नुकसान ग्रस्त महिलांची भेट घेत हे कृत्य करणाऱ्यांना पोलिसांनी शोधून काढावे अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने शोधून काढू असा आक्रमक इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आज गाबीत समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मालवणचे नूतन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. यावेळी कोल्हे यांचे पुषगुच्छ व गाबीत समाजाच्या माहितीचे पुस्तक भेट देऊन स्वागतही करण्यात आले. यावेळी गाबीत समाजाचे जिल्हा संघटक रविकिरण तोरसकर, बाबी जोगी, विकी चोपडेकर आदी उपस्थित होते.
मच्छी विक्रेत्या महिला आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करत असून कट्टा येथे झालेला प्रकार गंभीर आहे. ग्रामपंचायतीने नवीन बांधलेल्या मच्छी मार्केट मध्ये मासे साठवणूकीची कोणतीही व्यवस्था नाही, तसेच मच्छी विक्री साठी बसण्याचे ओटेही उंच असल्याने महिलांना वर बसता येत नाही. प्रतिकूल परिस्थितीत व्यवसाय करणाऱ्या महिलांचे मासे नासाडी करण्याचा प्रकार चुकीचा असून पुढेही असे प्रकार घडल्यास व्यवसाय करणे कठीण होईल. त्यामुळे संबंधिताना पोलिसांनी शोधून काढून कारवाई करावी, असे यावेळी गाबीत पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दोषींवर कारवाई होणार – पोलीस निरीक्षक कोल्हे
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक श्री. कोल्हे म्हणाले, मच्छी मार्केटबाबत महिलांच्या तक्रारी असताना ग्रामपंचायतीने त्याकडे लक्ष देणे गरजेचे होते. तसेच चर्चेतून आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न होणे गरजेचे होते. मात्र मासे नासाडी करण्याचा झालेला प्रकार अतिशय विकृत मानसिकतेचा आहे, त्यामुळे याबाबत आम्ही योग्य तो तपास करून दोषींवर कारवाई करण्याचा प्रयत्न निश्चितच करू, तसेच असे वाद व घटना भविष्यात पुन्हा होऊ नये यासाठी ग्रामपंचायत, ग्रामस्थ, मत्स्य विक्रेत्या महिला तसेच गाबीत व मच्छिमार समाज प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक येत्या दोन दिवसात आपण घेणार आहोत, असेही ते म्हणाले.
