तोंडवळी ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम

दोन कायमस्वरूपी शिक्षक देण्याची आहे मागणी;शाळेत विद्यार्थी न पाठविण्यावर ठाम राहण्याचा निर्णय

मालवण दि (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील तोंडवळी खालची जि. प. प्राथमिक शाळेत कायम स्वरूपी दोन शिक्षक द्यावेत या मागणीसाठी ग्रामस्थांनी मुलांना शाळेत न पाठविण्याचे आंदोलन गेले चार दिवस छेडले आहे. आजही पालकांनी शाळेत जमत मुख्याध्यापकांसोबत झालेल्या बैठकीतही ग्रामस्थांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत तात्पुरत्या शिक्षक नेमण्याच्या प्रक्रियेला आम्ही वैतागलो असून शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नाही, असे सांगितले.

जि. प. शाळा तोंडवळी खालची येथील शाळेत शिक्षक पदे रिक्त असून दोन कायमस्वरूपी शिक्षक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी तोंडवळी खालची येथील ग्रामस्थांनी मालवण पंचायत समिती शिक्षण विभागवर शुक्रवारी धडक देत जोपर्यंत शाळेत कायमस्वरूपी दोन शिक्षक नियुक्त केले जात नाहीत तोपर्यंत आम्ही मुलांना शाळेत पाठविणार नाही, अशी भूमिका तोंडवळी खालची ग्रामस्थ पालकांनी घेतली होती. शिक्षण विभागाने शाळेत तात्पुरत्या स्वरूपात एक कामगिरीवरील शिक्षक दिला असला तरीही पालक ग्रामस्थांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत मुलांना शाळेत पाठवलेले नाही.

आज पालक व ग्रामस्थांनी शाळेत जमत मुख्याध्यापकांसमवेत झालेल्या बैठकीत चर्चा केली. शाळेत चार शिक्षक मंजूर असून यापैकी या शाळेत नियुक्ती असणारा एक शिक्षक कामगिरीवर इतर शाळेत शिकवत असून त्यांच्या बदलीची मागणी करूनही बदली झालेली नाही. त्यामुळे शिक्षक पद भरलेले दिसत असल्याने येथे शिक्षक नियुक्ती होत नाही. तसेच गेले आठ वर्षे या शाळेत कामगिरीवरील शिक्षकच देण्यात येत आहेत. याला आम्ही कंटाळलो असून कायम स्वरूपी शिक्षक नसल्याने त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत आहे.

यावर मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाने तात्पुरता शिक्षक दिला असल्याने ग्रामस्थ व पालकांनी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हे लक्षात घेऊन मुलांना शाळेत पाठवावे, असे आवाहन केले. तसेच यावेळी केंद्रप्रमुखांशी फोन द्वारे झालेल्या चर्चेत शिक्षणमंत्र्यांनी शिक्षक भरती होणार असल्याचे जाहीर केल्याने लवकरच शिक्षक भरती झाल्यावर शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळतील, तोपर्यंत आता नेमलेले कामगिरीवरील शिक्षक दुसरीकडे पाठविले जाणार नाही याची लेखी हमी देतो, तो पर्यंत पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रप्रमुखांनी केले. मात्र ग्रामस्थांनी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचे सांगणे अमान्य केले. कायमस्वरूपी शिक्षकच देण्यात यावा, अशी मागणी कायम ठेवत शिक्षक न मिळाल्यास दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी शाळेसमोर आमरण उपोषणास बसू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

You cannot copy content of this page