आम. वैभव नाईक यांना आंदोलन करावे लागते ही त्यांचीच अधोगती – बबन शिंदे

⚡मालवण ता.२६-: आमदार वैभव नाईक हे गेली अडीज वर्षे सत्तेत होते तेव्हा त्यांना शाळांमध्ये शिक्षक नाही हे समजले नाही का? आता विरोधक म्हणून केवळ विरोध करण्यासाठी आम. नाईक आंदोलन करत आहेत. शिक्षक मागणीसाठी आम. वैभव नाईक यांना ठिय्या आंदोलन करावे लागते ही त्यांचीच अधोगती आहे, अशी टीका शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मालवण- कुडाळ विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.

शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद मालवण सागरी महामार्ग येथील हॉटेल रामेश्वर येथे झाली. त्यावेळी बबन शिंदे बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख राजा गावकर व महेश राणे, शहरप्रमुख बाळू नाटेकर, उपतालुका प्रमुख पराग खोत व अरुण तोडणकर, महिला आघाडीच्या भारती घारकर, उपशहरप्रमुख गीता नाटेकर, विभागप्रमुख अल्पेश निकम, शबनम शेख, महिला मयुरी घाडीगावकर, मारुती थोरवंशी, संतोष परब आदी उपस्थित होते.

यावेळी बबन शिंदे म्हणाले, शासन आपल्या दारी या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग साठी काय केले असे ठाकरे गटाकडून विचारले गेले होते. ना. शिंदे यांनी जिल्ह्यासाठी काय काय केले हे आम. वैभव नाईक यांनाच चांगले माहित आहे. तौक्ते वादळावेळी जिल्ह्याला मदत कोणी केली ? हे आम. नाईक यांना माहित आहे. आणि आता तीच मदत आम्ही केली, असे सांगून ठाकरे गटाचे पदाधिकारी भांडत आहेत. सगळेच मी केले असे म्हणणे आता आमदार वैभव नाईक यांनी सोडून द्यावे, अशी टीकाही बबन शिंदे यांनी केली.

यावेळी राजा गावकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमातून जिल्ह्यातील ७० हजार लाभार्थ्यांना लाभ झाला. तर २० हजार लाभार्थ्यांना विविध योजनाच्या लाभातून विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात मच्छिमार लाभार्थ्यांना बोट इंजिन व इतर मच्छिमारी साहित्य वाटपाचा समावेश आहे. आताच्या राज्य सरकारने विशेष लाभदायी योजना आणल्या असून त्या संघटना पदाधिकारी, बूथ प्रमुख, शिवदूत यांच्या मार्फत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम आम्ही करत आहोत, असेही राजा गावकर म्हणाले.

विरोधक सरकार व मंत्र्यांवर टीका करत आहेत, मात्र आम्ही या टिकेला विकास कामातून अचूक उत्तर देणार आहोत, असे राजा गावकर म्हणाले. मालवण शहरासाठी नगरोत्थान योजनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सव्वा दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. कोळंब खाडीतील गाळ उपसा ड्रेझिंग द्वारे करण्यात येणार आहे. तसेच आडारी नदी पात्रातील गाळही काढण्यात येणार आहे. मालवण बंदर जेटी ते मेढा राजकोट येथील पिराची भाट या किनारपट्टीवर बंधाऱ्याच्या कामासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून निधी प्राप्त होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच प्रलंबित राहिलेले मालवण शहरातील भुयारी गटार योजनेचे काम पूर्णत्वास नेण्यासाठीही मुख्यमंत्री शिंदे व शासनाकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत असेही राजा गावकर म्हणाले. तर महेश राणे यांनी सीवर्ल्ड प्रकल्प होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी करणार असल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page