⚡मालवण ता.२१-: देवबाग येथील विठ्ठल मंदिर येथे दि. २६ जून ३ जुलै या कालावधीत हरिनाम सप्ताह साजरा केला जाणार आहे. या दरम्यान दि. २९ रोजी देवशयनी आषाढी एकादशी उत्सव साजरा होणार आहे.
आषाढी एकादशीला सकाळी मंदिरात अभिषेक, नित्य पूजा झाल्यानंतर सकाळी ७.पासून देवदर्शनाला सुरुवात होईल. फक्त आषाढी एकादशी दिवशीच मंदिराच्या गर्भगृहात जाऊन विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेता येते. त्यामुळे देवबाग दशक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतात. या दिवशी सायंकाळी ५ पासून तारकर्ली येथील तारी घराण्याची दिंडी, देवबाग येथील भाजीवाडीची दिंडी, भाटकर यांची दिंडी देवदर्शनासाठी येते. त्यावेळी मंदिराचा परिसर विठ्ठलाच्या नामघोषाने दुमदुमून जातो. सप्ताह समाप्तीच्या आदल्या दिवशी सायंकाळी देवबाग येथील मांजरेकर घराण्याची दिंडी देवदर्शनाला येते. ३ जुलैला गुरुपौर्णिमेदिवशी दहिकाल्याने हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे, उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
