अन्यायकारक सेवा प्रवेश;नियमाविरोधात आक्रमक पवित्रा
वेंगुर्ला प्रतिनिधी- राज्य शासनाच्या २९ सप्टेंबर २०२१ रोजीच्या अन्यायकारक सेवाप्रवेश नियम अधिसूचनेस विरोध करून गेली दिड ते पावणेदोन वर्षे पदोन्नती तसेच १०, २०, ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणा-या आश्वासित प्रगती योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या कर्मचा-यांनी अखेर शासनाच्या लालफीतीतील निष्क्रीय कारभाराला कंटाळून ५ जुलै पासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे.
जुन्या सेवाप्रवेश अधिसूचनेनुसार १० वी उत्तीर्ण व आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडील १२ महिन्याचे मुलभूत प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांमधून निवड झालेल्या आणि आजपावेतो सलग शासनसेवेमध्ये २० ते २५ वर्षे सेवा झालेल्या कर्मचा-यांना नवीन अधिसूचनेनुसार पदोन्नतीसाठी विज्ञान पदवी उत्तीर्ण होण्याची अट घातली असून ही शैक्षणिक अर्हता शासनसेवेत राहून संपादन करणे शक्य नसल्याने ही जाचक अट रदद करणे तसेच १०० टक्के पदे पदोन्नतीने भरणे अशा ग्राह्य मागण्यांसाठी संघर्ष समितीने गेली दिड वर्षे निवेदने, उपोषणे, मंत्री, सचिव यांच्याकडे पाठपुरावा करून मांडल्या आहेत. जिल्हा परिषदेकडील समान पद, समान वेतन घेणा-या कर्मचा-यांच्या पदोन्नत्या, इतर लाभ जून्या नियमानुसार देण्यात येत आहेत. ही बाब अन्यायकारक असून याबाबत शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर संघर्ष समितीने उपोषणाचा निर्णय घेतला असून, याबाबत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, संबंधित विभागांचे सचिव, आयुक्त, संचालक, सहसंचालक यांना निवेदनाद्वारे सूचित केले आहे.
