⚡बांदा ता.१७-: गोवा येथिल श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान धारजोवाडा ,कुंडई फोंडा येथून निघालेल्या श्री संत सोहिरोबानाथ आंबिये वारकरी संप्रदायाच्या कुंडई ते पंढरपूर पायी आषाढी वारीचे शुक्रवारी सायंकाळी बांदा येथिल संत सोहिरोबानाथ आंबिये मठात स्वागत करण्यात आले.
गोव्यातून गुरुवार 15 जून रोजी आरंभ झालेली ही पायी वारी आषाढी एकादशीच्या आधी एक दिवस पंढरपुरात पोहोचणार आहे.या वारीत युवक,ज्येष्ठ नागरीक तसेच महिलांचाही सहभाग आहे.
बांदा येथे वारीचे आगमन झाल्यानंतर रथातील पादुका मठात नेण्यात आल्या.यावेळी नाथवंशज विवेक आंबिये यांनी पादुकांचे पुजन केले.नाथवंशज प्रसाद आंबिये व ज्येष्ठ भजनकर्मी गिरीश महाजन यांनी नाथांच्या पदांचे गायन केले. त्यानंतर नामस्मरण व आरती करण्यात आली. अल्पोपहार करुन नामाच्या गजरात वारी पुढे मार्गस्थ झाली.पुढे वारकऱ्यांनी बांद्यातील श्री विठ्ठल मंदिरात दर्शन घेतले.रात्री
वारीचा मुक्काम इन्सुली डोबाशेळ येथिल श्री संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिर येथे झाला.यावेळी इन्सुलीतही वारीचे भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी टाळ मृदुंगांच्या गजरात वारकरी दिंडीमुळे वातावरण भक्तीमय झाले होते.
त्याठीकाणी वारकऱ्यांची महाप्रसाद तसेच निवासाची सर्व व्यवस्था करण्यात आली होती.बांदा येथिल काही ग्रामस्थही या वारीत सहभागी झाले आहेत.परिसरातीलअनेक भाविकांनी यावेळी दर्शनाचा लाभ घेतला.
