भंडारी एज्युकेशन सोसायटीचे सुधीर हेरेकर यांचे प्रतिपादन
मालवण दि प्रतिनिधी
आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने शालेय अभ्यासाबरोबरच शालेयस्तरावर ज्या छोट्या मोठया स्पर्धात्मक परीक्षा होतात त्या परीक्षांचा विध्यार्थ्यांनी मन लावून एकाग्र चित्ताने अभ्यास करावा आणि आपल्या बरोबर आपल्या शाळेचा नावलौकिकही वाढवावा असे प्रतिपादन भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण), मुंबईचे कौन्सील ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन श्री. सुधीर हेरेकर यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत आणि शासनाच्या समग्र शिक्षा योजने अंतर्गत विध्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण समारंभ संस्थेचे कौन्सील ऑफ मॅनेजमेंटचे
चेअरमन श्री. सुधीर हेरेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी व्यासपीठावर लोकल कमिटीचे सेक्रेटरी श्री. दशरथ कवटकर, सहाय्यक शिक्षक अरविंद जाधव, संदीप अवसरे , श्रीमती पी जी मेस्त्री मॅडम, श्रीमती ए एस चव्हाण मॅडम, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई व इतर उपस्थित होते.
प्रारंभी नूतन मुख्याध्यापक श्री. एच. बी. तिवले यांनी स्वागत केले तर पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी श्री. हेरेकर व श्री कवटकर यांनी संस्था आणि प्रशाला या विध्यार्थ्यांच्या हिताचे राबवीत असलेल्या उपक्रमाची माहिती देऊन विध्यार्थ्यांनी मन लावून एकाग्र चित्ताने अभ्यास करावा व आपल्या बरोबरच आपल्या शाळेचे नाव उज्वल करावे असे सांगितले.
यावेळी प्रशालेत नव्याने प्रवेश घेतलेल्या नवोदित विध्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले तर इयत्ता पाचवी ते आठवीच्या विध्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. श्रीमती. मेस्त्री मॅडम यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई यांनी केले.
