⚡मालवण ता.१२-: गेली अनेक वर्षे मालवणच्या किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पत्रकारितेत स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारे तसेच नाट्य, कला, सिनेमा, सांस्कृतिक क्षेत्र, राजकारण आणि सामाजिक प्रश्नांवर अनेक वृत्तपत्रातून आवाज उठविणारे जेष्ठ पत्रकार, बहुआयामी व्यक्तिमत्व आणि मालवण तालुक्यातील वराड येथील सदानंद नरसिंह वराडकर उर्फ सदा वराडकर (वय ८४) यांचे मालवण मेढा येथे अल्पशा आजाराने आज दुपारी निधन झाले.
सदा वराडकर यांनी आपल्या उमेदीच्या काळात मालवणच्या स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात लिपिक म्हणून काही वर्षे नोकरी केली होती दरम्यानच्या काळात सदा वराडकर यांनी १९७५ च्या आसपास आणीबाणीच्या काळापासून मालवण मधील स्वर्गीय भाईसाहेब खांडाळेकर यांच्या जनयुग साप्ताहिक मधून फिरकी हे सदर सुरू केले होते भल्या भल्यांच्या टोप्या उडविणारे हे सदर कमालीचे लोकप्रिय झाले होते. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर बेळगाव चिपळूण येथून निघणाऱ्या दैनिकांमधूनही फिरक्या येणारे सदर चालविले. उंडग्याची उंडगेगिरी या टोपण नावानेही त्यांनी अनेक ठिकाणी लेखन केले.
गेल्या काही दिवसात ते अल्पशा आजाराने आजारी होते दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास मालवण मेढा येथे त्यांचे निधन झाले. सदा वराडकर यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे. उद्या सकाळी अकरा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
