युतीची उमेदवारी मिळणार नसल्याने वैभव नाईक सैरभैर

भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा आरोप

मालवण, दि प्रतिनिधी
कुडाळ मतदार संघात कोणत्याही परिस्थितीत विधानसभा उमेदवारी युतीच्या माध्यमातून मिळणार नाही याची पक्की खात्री झाल्यानेच वैभव नाईक हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. तब्बल चार वेळा छुप्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तर पाच वेळा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना भेटूनसुद्दा मालवण कुडाळ मतदार संघातून युतीच्या माध्यमातून उमेदवारी चा शब्द कोणीही दिला नाही. उलट कुडाळ येथील शासन आपल्या दारी याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे आपली उरली सुरली आशा संपल्याचे लक्षात आल्याने आमदार वैभव नाईक सैरभैर झाले आहेत. असा टोला भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी लगावला आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, खरेतर कुडाळ मालवण भाजप उमेदवार कोण ? याचे स्पष्ट संकेत कुडाळ येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रम निमित्ताने अधिक स्पष्ट झाले. त्यामुळे या मतदारसंघात युतीचा मोठा विजय होणार ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदी ठरली आहे. मालवण कुडाळ मतदार संघातून विधानसभेसाठी निलेश राणे हे नाव फिक्स आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते सक्षम आहेत. त्यामुळे पुन्हा विधानसभा आमदार हे वैभव नाईक यांना आता शक्य नाही. त्यांना परत आमदार व्हावे असे वाटत असेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शाश्वत विकास व्हावा असे मनापासून वाटत असेल तर केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर या तीनही नेत्यांशी जुळवून घ्यावे लागेल. तरच कदाचित राणे मोठ्या मनाने माफ करतील. वरील तिघांनी ठरवले तर विधानपरिषद आमदार म्हणून वैभव नाईक यांना संधी मिळेल. यातच त्यांचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे हित आहे. तरुण वयात नाईकांची राजकीय एक्झिट नको म्हणून हा प्रयोग करायला हरकत नाही. भविष्यात अनेक उबाठा कार्यकर्ते भाजप शिवसेनेत दाखल होतील. तरी या सर्वाचा विचार करता वैभव नाईक लवकरच योग्य निर्णय घेतील आणि त्यांचे स्वागत असेल असेही श्री. चिंदरकर यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page