⚡मालवण ता.०५-: देवबाग येथील मूळ रहिवासी आणि सेवानिवृत्त अभिलेखाधिकारी अशोक कान्हू खराडे (वय ७४) यांचे रविवारी मुंबईतील चेंबुर येथील निवासस्थानी निधन झाले.
राजभवन पुरालेखागार निर्मिती विभागाचे मुख्य संशोधकीय अधिकारी म्हणून अशोक खराडे यांनी सेवा बजावली होती. पुराभिलेख- विभागातून अभिलेखाधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. २००९ साली त्यांच्यावर राजभवन पुरालेखागाराची जबाबदारी सोपविण्यात आली. यात १९३४ ते २०१० या कालखंडातील ७७ वर्षांच्या अभिलेखामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल यांनी केलेल्या दुर्मीळ पत्रव्यवहाराचा समावेश आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारतीय संघ राज्यांना प्रशासकीय घटनांचा गोषवारा, कथन केलेली हस्तलिखित पत्रे या अभिलेखागारामध्ये आहेत. २००४ साली त्यांना मुंबईतील एका संस्थेमार्फत साने गुरुजी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मुंबईतील भारतीय इतिहास संशोधक मंडळावर ते कार्यरत होते. अखिल भारतीय गाबित समाज महासंघाचे कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
