शेर्ले – मडुरा मार्गावरील पूल धोकादायक स्थितीत

संरक्षक भिंत तोडल्याने धोका बळावला

⚡बांदा ता.०५-: बांदा शेर्लेमार्गे मडुरा रस्त्यावरील मारुती मंदिर नजीकचा पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. पूलाच्या खालील भागातील स्लॅब कोसळल्याने लोखंडी शीगा बाहेर आल्या आहेत. शिवाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाईपलाईन टाकण्यासाठी केलेल्या खोदाईमुळे हा पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. या पूलाच्या बांधकामासाठी निधीची तरतूद करावी व पावसाळ्यानंतर तातडीने पूलाचे बांधकाम करण्याची मागणी सरपंच उदय चिंदरकर यांनी केली आहे.
      बांदा शेर्लेमार्गे मडुरा रस्त्यावरील पूल स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच सन १९३० मध्ये वालावलकर कुटुंबियांकडून बांधण्यात आल्याचा उल्लेख आढळतो. म्हणजेच या पूलाला तब्बल ९३ वर्षे उलटली आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाईपलाईन टाकण्यासाठी केलेल्या खोदाईची पाहणी सरपंच उदय चिंदरकर, माजी ग्रा. पं. सदस्य प्रकाश वालावलकर, उल्हास वालावलकर यांनी केली. यावेळी पूलाची नाजूक स्थिती निदर्शनास आली.
       महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाईपलाईन टाकताना संबंधित ठेकेदाराने पूलालगत असलेली संरक्षक भिंत तोडली आहे. त्यामुळे पूलाला धोका निर्माण झाल्याचा आरोप यावेळी प्रकाश वालावलकर यांनी केला. या मार्गावरुन दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. पावसाळ्यात सदर पूल कोसळल्यास मडुरा दशक्रोशीतील नागरिकांसमोर समस्या उभी राहणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूलाची पाहणी करुन तात्पुरती डागडुजी करावी अशी मागणी होत आहे.

चौकट
     शेर्ले – मडुरा दरम्यान रस्ता डांबरीकरणाचे काम मंजूर आहे. शेर्लेपासून सुमारे एक किमी रस्त्याचे खडीकरणाचे काम महिनाभरात संबंधित ठेकेदाराने रडतखडत केले आहे. पावसाळा तोंडावर आल्याने आता पुढच्या वर्षीच डांबरीकरण होणार हे निश्चित आहे. तत्पूर्वीच पूलाचे काम पूर्णं करण्यासाठी पाठपुरावा करणार असे सरपंच उदय चिंदरकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page