⚡मालवण ता.०३-: कांदळगाव येथील श्री निसर्गदत्त महाराज भक्ती ज्ञान केंद्रातर्फे मालवण तालुक्यातील शासकीय वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या मालवण ग्रामीण रुग्णालय तसेच पेंडूर (कट्टा), मसुरे, आचरा, चौके, गोळवण, हिवाळे या प्राथमिक आरोग्य केंद्राना सात संगणक व पाच एअर कंडिशनर लोकार्पण करण्यात आले.
कांदळगाव येथे भक्ती ज्ञान केंद्रात वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. निसर्गदत्त महाराज भक्ती ज्ञान केंद्रामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. लोकोपयोगी साधने पुरवून समाजोपयोगी काम होईल या उद्देशाने या केंद्राच्या वतीने मालवण मधील नेत्रविशारद डॉ. मधुकर ठाकूर, रमेश करंगुटकर, रमेश आचरेकर यांच्या सहकार्याने आरोग्य केंद्राना संगणक व एअर कंडिशनर देण्यात आले. या साधनांच्या सुविधेमुळे आरोग्य केंद्राच्या कार्यपद्धतीत सुधारणा होऊन सामान्य जनतेला त्यांचा फायदा होईल, असे यावेळी डॉ. संजय पोळ यांनी सांगितले. यावेळी डॉ. स्वप्नील बोदमवाड, डॉ. कपिल मेस्त्री, डॉ. दीप्ती सूर्यवंशी, डॉ. प्रणव पोळ, आरोग्य विस्तार अधिकारी सूरज बांगर, आरोग्य सहाय्यक राजाराम परब, व्ही. सी. पारकर, आरोग्य सेविका के. पी. तोरसकर, श्री निसर्गदत्त महाराज भक्ती ज्ञान केंद्राचे खजिनदार दिपक भोगले आदी व इतर उपस्थित होते.
