प्रोत्साहन लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण ४ जून पर्यंत पूर्ण करा

उपनिबंधक मंगेश सांगळे यांचे आवाहन

ओरोस ता.०३-:

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी ४ जून पर्यंत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक मंगेश सांगळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाचे सहकार विभागामार्फत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना २९ जुलै २०२२ च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या तीन वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ हजार २२४ खातेदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यातील १५ हजार ७१८ खातेदारांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यापैकी १४ हजार १४९ खातेदारांच्या खात्यात ४३ कोटी ६६ लाख एवढी रक्कम सहकार विभागाकडून जमा करण्यात आलेली आहे. तर अद्याप ५०३ खातेदारांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १७३ खातेदार, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे ५२ खातेदार तसेच राष्ट्रीयकृत, व्यापारी बँकांचे २७८ खातेदार आहेत. या खातेदारांनी ४ जून २०२३ पर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे. तसेच संबंधित बँकांनी आधार प्रमाणिकरण करणे शिल्लक असलेल्या खातेदारांची संपर्क साधून आधार प्रमाणिकरण पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक मंगेश सांगळे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page