तात्काळ नगरपंचायत, १०० कोटींचा निधी मागणार

राजन तेली:सिंधुदुर्गनगरी विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार निवेदन

ओरोस ता.०२-:

“शासन आपल्या दारी” योजनेच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६ जून रोजी जिल्हा दौऱ्यावर आहेत. शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. त्यामुळे या दौऱ्यात भाजप पक्ष सिंधुदुर्गनगरी तात्काळ नगरपंचायत जाहीर करावी. तसेच जिल्ह्याच्या राजधानीचा रखडलेला विकास करण्यासाठी विशेष बाब म्हणून १०० कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात तेली यांनी पत्रकार परिषद घेवून ही माहिती दिली. यावेळी ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना तेली यांनी या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी तेली यांनी, सिंधुदुर्गनगरी ही जिल्ह्याची राजधानी आहे. त्यामुळे येथे नगरपंचायत होणे अत्यंत गरजेचे आहे. मुख्यालय विकासासाठी प्राधिकरण स्थापन केलेले आहे. परंतु अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नाही. त्यामुळे येथे लवकरात लवकर नगरपंचायत व्हावी, असे सर्वांना वाटते. नेमकी हीच मागणी भाजप पक्ष मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ही मागणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page