डी वाय एस पी विनोद कांबळे
वैभववाडी संजय शेळके :
जनतेच्या सहकार्यामुळेच पोलीस खात्याचे काम अधिक सुलभ होते. आपत्तीच्या काळात जनतेने प्रशासनाला असेच सहकार्य करत राहावे. करुळ सह्याद्री रक्षक व ग्रामरक्षक दलाचे काम कौतुकास्पद आहे. भविष्यात या दलाची दखल निश्चित प्रशासन घेईल असे प्रतिपादन कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनी केले.
करुळ ग्रामपंचायत सभागृहात सह्याद्री रक्षक व ग्रामसुरक्षा दल यांच्या उपस्थितीत आपत्तीकालीन आढावा बैठक पार पडली. या बैठकीला करूळ सरपंच नरेंद्र कोलते, पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, उपसरपंच सचिन कोलते, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश कोलते, सह्याद्री जीव रक्षक अध्यक्ष हेमंत पाटील, पोलीस पाटील प्रताप पाटील, ग्रा.पं. सदस्य जितेंद्र पवार, ग्रामसेवक शशिकांत गुरव व सह्याद्री जीव रक्षक ग्राम सुरक्षा दलचे सदस्य उपस्थित होते.
वैभववाडी तालुक्यात करूळ व भुईबावडा हे घाट येतात. आपत्तीच्या काळात घाटात घटना घडत असतात. तसेच घाट मार्गात अपघात ही घडत असतात. अशावेळी पोलिसांना सहकार्य जनतेचे असते. त्यामुळेच पोलिसांचे काम अधिक सुखकर होते. मागील काही वर्षात येथील सह्याद्री जीव रक्षक व ग्रामरक्षक दलाने सामाजिक बांधिलकी जोपासत केलेले काम पोलीस प्रशासन कधीही विसरणार नाही. ग्रामरक्षक दलाला आवश्यक तो साहित्य पुरवठा नक्कीच केला जाईल. असे कांबळे यांनी सांगितले. सागर खंडागळे म्हणाले, आपत्तीच्या काळात ग्राम रक्षक दल व पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय असला पाहिजे. करूळ ग्राम रक्षक दलाने आपत्तीच्या काळात दिलेले योगदान हे न विसरण्यासारखे आहे. या दलाच्या पाठीशी पोलीस प्रशासन नेहमीच राहील असे सांगितले. सरपंच नरेंद्र कोलते, हेमंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वैभववाडी पोलीस ठाण्याकडून ग्रामरक्षक दलाला बॅटरी भेट देण्यात आली. करुळ ग्रामपंचायत व सह्याद्री जीव रक्षक यांच्या वतीने विनोद कांबळे, सागर खंडागळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शशिकांत गुरव यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
