पोलीस भरतीत दोघांनी दाखल केली बनावट कागदपत्रे

भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त असल्याचे दाखले जोडत नोकरी मिळविण्याचा प्रयत्न;सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हे दाखल

ओरोस ता.३१-:

नुकतीच पोलीस शिपाई भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल भरतीत चक्क दोन उमेदवारांनी बोगस प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या आदेशानुसार ज्ञानेश्वर भाऊसाहेब सातपुते ( रा.जाम्ब शिरूर कासार, जिल्हा बीड ) आणि कृष्णा राजेंद्र राचमले ( रा.मावलगाव, अहमदपूर, जिल्हा लातूर ) या दोघांवर फौजदारी गुन्हे सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
सिंधुदुर्ग पोलीस दलातील रिक्त असलेल्या जागांसाठी पोलीस भरती २०२१ ही प्रक्रिया राबविण्यात आली. ९९ पोलीस शिपाई तर २२ चालक अशा एकूण १२१ पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडली. प्रथम मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची संवर्ग नुसार एका जागेसाठी दहा अशी लेखी परीक्षेसाठी यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आली. यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करून कागदपत्र पडताळणीसाठी त्यांना बोलाविण्यात आले होते. यावेळी हा प्रकार उघड झाला.
भरतीसाठी भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त असल्याचा बोगस दाखला या दोघांनी जोडला होता. हे दोघे उमेदवार पोलीस भरतीसाठी पात्र ठरले होते. पात्र उमेदवारांच्या सर्व शैक्षणिक आणि अन्य आरक्षण निहाय दाखल्याची पडताळणी करण्यात येते. या दोन्ही उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचे पडताळणीत सिद्ध झाले आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर सातपुते आणि कृष्णा राचमले यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्यांवर फसवणुकीसह अन्य कलामांद्वारे सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती स्वतः पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page