ग्राहकाचे पाकीट केले हातोहात लंपास;सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी कैद..
⚡मालवण ता.१५-: मालवण शहरात सध्या पाकीट मार आणि भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला असून सोमवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराच्या गर्दीत या चोरांचा मोठा उपद्रव दिसून येत आहे. आज सकाळी मालवण मच्छीमार्केट जवळील हॉटेल शिरगांवकर मध्ये खरेदी करणाऱ्या रोहिदास महादेव मुळे (सध्या रा. कांदिवली मुंबई, मूळ रा. तोंडवळी, ता. मालवण) या ग्राहकाच्या पॅन्टच्या खिशातील पैशाचे पाकीट तीन चोरांच्या टोळक्याने लंपास केल्याची घटना घडली. याबाबत हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये ते तिघेही चोर सफाईदारपणे पाकीट चोरताना दिसून आले आहेत. या पॉकेट मध्ये रोहिदास मुळे यांचे पैसे तसेच महत्वाची कागदपत्रे व बँक एटीएम कार्ड होते. मुळे यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र या चोरांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रोहिदास मुळे आज सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास मालवण मच्छी मार्केट नजीक असलेल्या शिरगांवकर हॉटेल मध्ये खरेदी साठी थांबले होते. खरेदी करून झाल्यावर तेथून निघाल्यावर त्यांना आपल्या पॅन्टच्या बाजूच्या खिशात ठेवलेले पैशाचे पाकीट सापडून आले नाही. वाटेत पडले असावे या विचाराने ते पाकीट शोधत पुन्हा शिरगांवकर हॉटेल पर्यंत आले. आपले पाकीट हॉटेल च्या ठिकाणी सापडले का अशी विचारणा मुळे यांनी हॉटेलचे हेमंत शिरगांवकर यांच्याकडे केली. मात्र कोणतेही पाकीट सापडले नसल्याचे शिरगांवकर यांनी सांगितल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले. त्या फुटेज मध्ये मुळे हे खरेदी करत असताना तीन तरुण त्यांच्या मागे उभे राहून खिशातील पाकीट काढून मच्छी मार्केटच्या दिशेने पसार झाल्याचे दिसून आले. पाकीट चोरांनी लंपास केल्याचे समजल्याने मुळे यांना धक्का बसला. या पाकीट मध्ये त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड अशी महत्वाची कागदपत्रे तसेच बँकेची दोन एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड होते.
याबाबत रोहिदास मुळे यांनी तात्काळ मालवण पोलीस स्थानकात धाव घेत पाकीट चोरी झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना सादर केले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या चोरीच्या प्रकारामुळे मालवण मध्ये खळबळ उडाली असून गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी अशा भुरट्या चोरांपासून सावध राहणे गरजेचे बनले आहे.
