गावठी मिरची भडकली तर आल्याचा भाव उतरला
⚡बांदा ता.१६-: पावसाळा महिन्याभराच्या कालावधीवर येऊन ठेपल्याने सोमवारी बांदा आठवडा बाजारात सुक्या मासळीला ग्राहकांची अधिक मागणी होती. मागणी वाढल्याने सुक्या मासळीचे दरही गगनाला भिडले. तर गावठी मिरचीचे दर कमी न झाल्याने मिरची तिखट झाली असून गतबाजार भावाच्या तुलनेत आल्याचे दर काहीसे कमी झाल्याचे दिसून आले. वाढत्या उन्हाचे चटके बसत असले तरी सुद्धा बाजारहट करण्यासाठी ग्राहकांची तुफान गर्दी झालेली बांदा आठवड्या बाजारात दिसून आली.
बांदा बाजारपेठे 40 ते 45 गावातील नागरिक तसेच गोवा-पेडणे येथील नागरिक खरेदीसाठी येत असल्याने येतात. मासेमारीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे सध्या सुक्या मासळीला अधिक मागणी आहे. पावसाळ्यातील बेगमीसाठी घरोघरी सुकी मासळीची साठवण केली जाते, पण मागणी वाढल्याने सुक्या मासळीचे दर गगनाला भिडले. परिणामी गृहिणींचे आर्थिक नियोजन कोलमडले.

सुकी मासळीला भाव आला!
सुंगटा 450 रुपये किलो, बोक्सी 350 रुपये, बांगडा शंभर रुपयाला दहा, बोंबील 20 रुपये वाटा, गोलम 250 रुपये, मोतयाळे 300 रुपये अशाप्रकारे वेगवेगळ्या सुक्या मासळीचे दर बांदा आठवडा बाजारात होते.
गावठी मिरची झाली तिखट
कोरोना काळात गावठी मिरचीचे वाढलेले भरमसाठ दर अद्यापही न परवडणारे आहेत. सद्यस्थितीत 700 रुपये किलो गावठी मिरची असल्याने जेवणाची चव तिखट बनली आहे.
आला 300 रुपये किलो!
एकीकडे वाढती महागाई आणि दिवसेंदिवस भाज्या आणि जीवनावश्यक वस्तू महाग झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले. आठवडा बाजारात आला 300 रुपये किलो, चिटकी 50 रुपये, भेंडी 50 रुपये, शिमला मिरची 80 रुपये, काकडी 40 रुपये, गाजर 50 रुपये, कोबी 40 रुपये, कांदे 20 रुपये, बटाटा 30 रुपये किलो लिंबू 20 रुपयेला 5 मग, हिरवी मिरची 20 रुपये वाटा, कोथिंबीर 20 पेंडी अशाप्रकारे अनेक भाज्यांचे वेगवेगळे दर पाहायला मिळाले.
