ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत यांचा इशारा : पावसाळ्यात रस्ता वाहून जाण्याची शक्यता
बांदा/प्रतिनिधी
जीवन प्राधिकरण विभागाने पाण्याची जलवाहिनी टाकण्यासाठी बांदा गडगेवाडी रस्त्याची खोदाई केल्याने साईडपट्टी धोकादायक व कमकुवत बनली आहे. पावसाळ्यात रस्ता वाहून जाण्याची शक्यता असल्याने याची वेळोवेळी कल्पना देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याची डागडुजी करण्याबाबत चालढकल करत आहे. येत्या चार दिवसात डांबरीकरणं करून साईडपट्टी पूर्ववत न केल्यास याठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी दिला आहे.
आज सकाळी त्यांनी ग्रामस्थ्यांसह पाहणी करत बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. पावसाळ्याच्या तोंडावर जलवाहिनीसाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली आहे. पाईप टाकल्यानंतर केवळ माती टाकून भराव भरण्यात आला आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसात भरावाची माती वाहून गेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्ता वाहून जाण्याची शक्यता आहे. तसेच मातीच्या कच्च्या भरावामुळे याठिकाणी बरेच अपघात देखील झाले आहेत.
ठेकेदाराने केवळ थुकपट्टी केल्याने रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे. याची कल्पना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण तसेच कनिष्ठ अभियंता विजय चव्हाण यांना देण्यात आली आहे. मात्र अद्यापपर्यंत याची दखल न घेण्यात आल्याने सनदशीर मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर, रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर, दिपलक्ष्मी पटेकर, स्वप्नील महाले, जय पटेकर, विकी कदम, गोविंद सावंत, सागर गाड आदी उपस्थित होते.
