⚡मालवण ता.१५-:
मालवण येथील संतसेना मार्गावरील नाभिक बांधवांची कुलदैवता देवी भैरवी मंदिरचा १४ वा वर्धापन दिन सोहळा दि. १६ ते २१ मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त श्री देवी भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.१६ मे रोजी भैरवी मंदिरात होम होणार आहे. यावेळी देवीचा नारळ बदलण्यात येणार आहे. २० रोजी सत्यनारायण महापूजा, सायंकाळी सुनील परुळेकर यांचे गायन, रात्री देवी सातेरी भजन मंडळ कांदळगावचे बुवा राजेंद्र कोदे यांचे भजन, ओम भद्रकाली दशावतार नाट्यमंडळ, पेंडुर यांचा “कालसर्प’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. २१ रोजी रात्री ८ वाजता रवळनाथ भजन मंडळ आडवलीचे बुवा विनायक भिडे व ब्राह्मणदेव भजन मंडळ कातवडचे बुवा मंगेश नलावडे यांच्यात डबलबारी भजन सामना रंगणार आहे. भिडे यांना पखवाज साथ गौरव लाड व तबला साथ प्रसाद यादव, तर नलावडे यांना पखवाज साथ गौरव चव्हाण व तबला साथ मनीष डिकवलकर करणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.
