⚡मालवण ता.१५-: मालवण शहरातील फोवकांडा पिंपळपार येथून ग्रामीण रुग्णलयाकडून नाचनोलकर घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याने वाहतूक करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण व्हावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
फोवकांडा पिंपळपार ते नाचनोलकर घरापर्यंत जाणारा रस्ता शहरातील मेढा भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्यास मिळतो. मेढा व राजकोट भागात जाण्यासाठी हाच रस्ता सोयीस्कर ठरतो. मात्र या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खडी पूर्णतः उखडून गेली असून काही ठिकाणी खड्डेही पडले आहेत. तर या रस्त्यावर भुयारी गटारचे चेंबर असून त्याच्या सभोवतालचा रस्ता खचून खड्डा पडला आहे. यामुळे उंच सखलपणा निर्माण झाल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याच चेंबरच्या ठिकाणी सायकल व मोटारसायकल स्वार यांचे अपघातही झाले आहेत. मात्र या रस्त्याच्या दुरावस्थे बाबत स्थानिक नागरिकांनी लक्ष वेधूनही नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. याबाबत माजी उपगराध्यक्ष महेश जावकर यांनीही नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मेढा भागातील युवासेना वार्डप्रमुख नितेश पेडणेकर यांनीही या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सातत्याने आवाज उठविला आहे. मात्र, अद्यापही या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून पावसाळ्यात या रस्त्याची आणखी दुरावस्था होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तरी या रस्त्याचे डांबरीकरण होणार का ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
