⚡मालवण ता.१३-: सध्याच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःला काय बनायचे आहे हे स्वतःमधील गुण ओळखून ठरवले पाहिजे. करियर निवडताना पूर्ण तयारीनीशी व ते पूर्ण करण्याचे ध्येय बाळगूनच निवडावे. विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षणापेक्षा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळावे, जेणेकरून त्यातून विद्यार्थ्यांमधील कला कौशल्य विकसित होऊन नोकरी व व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतील, असे मार्गदर्शन मालवण येथे आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनतर्फे आयोजित करियर मार्गदर्शन सेमिनार मध्ये करण्यात आले.
आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन यांच्यातर्फे मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे करिअर मार्गदर्शन सेमिनार संपन्न झाले. यावेळी हॉटेल मॅनेजमेंट व हेल्थ सायन्स या विषयांचे व्यावसायिक उच्च शिक्षण, नवीन शैक्षणिक धोरण याविषयी बारावी परीक्षा दिलेले विद्यार्थी व इतर विद्यार्थी तसेच पालक यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या संचालिका पूर्वा तावडे व आयटीएम आयएचएम अँड आयएचएस मार्केटिंग जनरल मॅनेजर संतोष करंगुटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्यामधील कला कौशल्यला वाव असणारे करियर विद्यार्थ्यांनी निवडले पाहिजे, सामान्य माध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलो तरी आपल्या जीवनात काहीतरी साध्य करण्याचे ध्येय विद्यार्थ्यांनी ठेवले पाहिजे असे यावेळी संतोष करंगुटकर यांनी सांगितले. तर पूर्वा तावडे यांनी हॉटेल मॅनेजमेंट विषयी मार्गदर्शन करताना आज मालवण मध्ये पर्यटन वाढत आहे, चांगली हॉटेल्स निर्माण होत आहेत, मात्र या हॉटेल्स मध्ये दर्जेदार सेवेचा अभाव दिसून येतो. हाच अभाव दूर करण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट हा एक उत्तम अभ्यासक्रम असून याच्या विविध विभागात विद्यार्थी करियर घडवू शकतात. मालवण मधील विद्यार्थ्यांनी हॉटेल मॅनेजमेंट कडे करियर म्हणून बघून भविष्यात मालवणात चांगल्या हॉटेल सेवा निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले. यावेळी सागर जानराव, सिद्धेश कुपटे, सुकेश नगरकर यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
