हर हर महादेवाच्या घोषात कलशारोहण
⚡कणकवली ता.१३-: कणकवली तालुक्यातील साळिस्ते गावचे ग्रामदैवत श्री देव खांबेश्वर मंदिराचा कलशारोहण सोहळा श्री मठ संस्थान दाभोली येथील श्रीमत दत्तानंद सरस्वती महाराज यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, भाविक आणि माहेरवाशीणी उपस्थीत होत्या. यादरम्यान तीन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.
या जिर्णोध्दार सोहळ्यानिमित्त आयोजित तीन दिवस विविध कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भाविकांच्या प्रचंड उपस्थितीत संपन्न झालेत. या सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले. सकाळी 8.50 वा. शुभ मुहूर्तावर श्रीमत दत्तानंद सरस्वती महाराज यांच्या शुभहस्ते कलशारोहण सोहळा पार पडला. त्यानंतर मुर्तिप्रतिष्ठापना तत्वन्यास, पूर्वक प्राणप्रतिष्ठापना, देवतांची महापुजा, महाबलिदान आणि महापुर्णाहुती, प्रतिष्ठा उत्तरांग विधी, अभिषेक, विभूतीवंदन, देवालय उत्सर्ग, युप स्थापना, कर्म समाप्ती असे धार्मिक कार्यक्रम झालेत. त्यानंतर महाआरती, गाऱ्हाणे, महाप्रसाद, दुपारनंतर देवीची ओटी भरणे व महिलांचे हळदी कुंकू असे कार्यक्रम झालेत.
रात्री जि.प.शाळा साळिस्ते नं. 1 च्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन विविध कलागुण प्रदर्शित केले. यावेळी या सर्व मुलांना तसेच, पहिल्या दिवशी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागी सर्व मुलांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. डबलभारी भजनाचा जंगी सामना झाला. या सोहळ्या दरम्यान खासदार विनायक राऊत, नगरसेवक बाळा नर, सतिश सावंत, सचिन सावंत, जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार, कणकवली माजी सभापती दिलीप तळेकर, वारगाव उपसरपंच नाना शेट्ये, राजा जाधव, नडगिवे सरपंच श्रीम. लाड, खारेपाटण माजी सरपंच विरेंद्र चिके, विजय केसरकर, संदेश पारकर, तळेरे व्यापारी संघटना अध्यक्ष स्वप्निल कल्याणकर, तळेरे माजी सरपंच विनय पावसकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन दर्शन घेतले. या सर्व कार्यक्रमांना साळिस्ते ग्रामस्थ, भाविक, माहेरवाशीन, पाहुणे यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
