निसर्ग मित्र परिवाराचा नवा संकल्प
सीड बँक व सीड बाॅल बनविणार

⚡कणकवली ता.०८-: ‘निसर्ग मित्र परिवार’ ही पर्यावरण प्रेमी सामाजिक संस्था सन १९९३ पासून निसर्ग व पर्यावरण विषयक विविध उपक्रम राबवित आलेली आहे. त्यामध्ये वृक्षारोपन, वृक्ष संवर्धन, कचरा मुक्ती, व सार्वजनिक स्वच्छता इ. विविध उपक्रमांचा समावेश आहे.निसर्ग मित्र परिवाराच्यावतीने यावर्षी पासून सीड बॅंकेची संकल्पना राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

उन्हाळी हंगामामध्ये कोकणातील कोकणी मेव्याचा अर्थातच आंबा, काजू, फणस, जांभूळ, आवळा, चिंच, रतांबा, रामफळ, सीताफळ, चिकू इत्यादी प्रकारची फळे खातो व त्यांच्या बीया कचऱ्यात फेकून देतो. पण असे न करता आपण खालेल्या फळांच्या बिया एकत्रित साठवून, त्या पाण्याने स्वच्छ धुवून नंतर त्या उन्हामध्ये चांगल्याप्रकारे सुकवाव्यात. त्यानंतर त्या बीया स्वतंत्र पिशवीत साठवून ठेवाव्यात.

याचे कारण असे की, निसर्ग मित्र परिवाराच्या वतीने यावर्षी पासून सीड बॅंकेची संकल्पना राबविण्याचे आम्ही निश्चित केले आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण साठविलेल्या बीया सीड बॅंकेत एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात जमा केल्या जातील व त्या मधील विविध प्रकारच्या बिया येत्या पावसाळ्यात रुजत घालून त्याची रोपे तयार केली जातील. ही रोपे आपल्या गावातील वाडी-वस्ती रस्त्याच्या दुतर्फा, शाळा व महाविद्यालय परिसर तसेच पडीक जमीनीवरती लावण्याची मोहीम राबवली जाणार आहे. तसेच भविष्यात ही निसर्ग हिताची चळवळ अधिक व्यापक करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी आपल्या प्रत्येकाचा उत्स्फूर्त सहभाग लाभावा आणि त्याद्वारे आपण जमा केलेल्या बीया निसर्ग मित्र परिवाराच्या सीड बॅंकेत जमा करून सहकार्य करावे
सीड बँक उपक्रमाद्वारे जमा केलेल्या बीया येत्या पावसाळ्यात रुजत घालणे व त्याची रोपे तयार करून त्यांची लागवड करणे ही मोहीम निसर्ग मित्र परिवार मार्फत होती घेतली जाणारच आहे. त्याचबरोबर त्या बीया, माती आणि खत यांचा वापर करून त्याचे सीड बाॅल बनविले जाणार आहेत. माती आणि खत यांचे मिश्रण तयार करून व त्या प्रत्येक बाॅलमध्ये काही बीया टाकून केलेले सीड बॉल येत्या पावसाळ्यात आपल्या गावातील देवराई, ओसाड टेकड्या व डोंगर यांसह ओढा व नदी किनारे, रस्त्यांच्या दुतर्फा, पडीक जागा या सारख्या ठिकाणी फेकून पेरण्यात येणार आहेत. त्यातून वनसंपदा वाढीसाठी मदत होणार आहे. ही मोहीम यावर्षीच्या पावसाळ्यापासून निसर्ग मित्र परिवार मार्फत राबविण्यात येणार आहे. त्यासाठी देखील आपले सर्वाचे सहकार्य आणि योगदान महत्त्वाचे आहे.
निसर्ग मित्र परिवार सीड बँक व सीड बॉल हे उपक्रम राबविण्याचा संकल्प करत आहे. त्याला निश्चितच आपण सर्व जणांनी चांगला भरभरून प्रतिसाद देऊन सहकार्य करावे असे आवाहन निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष- संजय खानविलकर व सचिव- राजेश जाधव यांनी निसर्ग मित्र परिवार मार्फत केले आहे.

You cannot copy content of this page