⚡मालवण ता ०८-: मालवण शहरात पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे काही ठिकाणी बंद स्थितीत असून हे कॅमेरे लवकरात लवकर सुरु करावेत, अशी मागणी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेनेचे मालवण तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांनी पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मालवण शहरात चोऱ्यांच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे सुरक्षितता व तपासाच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे शहरात काही ठिकाणी बंद अवस्थेत असलेली सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा लवकरात लवकर सुरू करावी, असेही मंदार ओरसकर यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी माजी नगरसेवक मंदार केणी, सिद्धेश मांजरेकर, विघ्नेश मांजरेकर, सर्वेश लुडबे, रुपेश परब, दत्ता पोईपकर उपस्थित होते.
