वेरलीच्या जि. प. प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर हिरक महोत्सवात महाराष्ट्राची लोकधाराने रसिक झाले चिंब

⚡मालवण ता.०६-: सुमधुर लोकगीते…. नेत्रदिपक प्रकाश योजना…. आणि लहान मुलांनपासून मोठ्यांपर्यंत रंगमंचावर थिरकणारे पाय त्याला उपस्थितानी टाळ्या शिट्याच्या गजरात दिलेली दाद अशा भारलेल्या वातावरणात गेले दोन दिवस वेरली येथील जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर हिरक महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाने उपस्थितांची मने चिंब भिजून गेली.

मालवण तालुक्यातील वेरली येथील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर हिरक महोत्सवानिमित्त गेले दोन दिवस विविध उपक्रम राबवितानाच सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. गुरुवारी वेरली गावातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर हिरक महोत्सवाच्या निमित्ताने उत्साहपूर्ण वातावरणात आजी माजी विद्यार्थी शतकोत्तर हिरक महोत्सव समिती शाळा समिती, शिक्षक पालक संघ, शाळेचा शिक्षक वृंद, पालक यांच्या सहभागाने काढण्यात आलेली शोभायात्रा लक्षवेधी ठरल्यानंतर पहिल्या दिवशी प्रशालेच्या तीस चिमुरड्या विध्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा भाग १ हा सागर गणेश रेडकर या युवा कोरिओग्राफरणे सादर केलेला कार्यक्रम उपस्थितांची वाह वा मिळवून गेला. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी प्रशालेमध्ये नेत्र तज्ञ प्रमोद परब यांच्या सहकार्याने नेत्रचिकित्सा शिबीर घेण्यात आले. या शिबिराचा साठ जणांनी लाभ घेतला. तर रात्रौ सागर रेडकर यांच्या नृत्य दिग्दर्शीत महाराष्ट्राची लोकधारा भाग २ हा पालक ग्रामस्थ माजी विध्यार्थी शिक्षक यांनी सादर केलेल्या कार्यक्रमालाही रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. महाराष्ट्राच्या लोककले बरोबरच लोक संस्कृती लोप न पावता त्याची जपणूक व्हावी या हेतूने प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभदा गणेश रेडकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राची लोकधारा भाग १ व २ सादर करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे ग्रामीण जीवन रंगमंचावर दाखवताना गणेश वंदन, वासुदेव, गोंधळी, पांगुळवाला विविध फुगड्या, शेतकरी नृत्य, लावणी, कोळी डान्स, शिव राज्याभिषेक असे कार्यक्रम सादर करण्यात आले. पहिल्या भागात प्रशालेच्या तीस विध्यार्थ्यांनी तर दुसऱ्या भागात गावातील आजी माजी विध्यार्थी पालक शिक्षक वृंद ग्रामस्थ अशा साठ जणांनी सहभाग घेतला. तसेच दोन दिवसात एकपात्री विविध प्रकारचे रेकॉर्ड डान्स, नृत्ये, स्किट सादर करण्यात आले. याच कार्यक्रमात गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील माहेरवाशीणिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. विशेष म्हणजे मुख्याध्यापिका सौ. शुभदा रेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक राजेंद्र धारपवार, उदय कदम, पूर्वा केळूसकर यांनी शतकोत्तर हिरक महोत्सवातील कार्यक्रम तसेच उपक्रम यशस्वीरित्या पार पाडले. या प्रशालेच्या शतकोत्तर हिरक महोत्सवाची संकल्पना पूर्णत्वास नेणाऱ्या तसेच मुलांच्या अभ्यासा बरोबरच विविध कला गुणांना वाव देणाऱ्या मुख्याध्यापिका सौ. शुभदा गणेश रेडकर यांचा तसेच या कार्यक्रमाला सहकार्य करणारे गणेश रेडकर, सागर रेडकर यांचा सरपंच धनंजय परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शतकोत्तर हिरक महोत्सव समितीचे अध्यक्ष विजय परब, उपाध्यक्ष आबा परब, उपसरपंच दिनेश परब, सेक्रेटरी सुरेश मापारी, अनंत भोगले, शाळा समितीचे अध्यक्ष गौतम तांबे, बाळा मेस्त्री, माजी सरपंच आनंदी परब, माजी उपसरपंच शामा चव्हाण, पोलीस पाटील प्रमोद परब, बुद्धिधन तांबे, चंद्रकांत परब, आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page