ग्रामपंचायत व कोकण संस्थेचे आयोजन;गृहिणींना स्वावलंबी बनविण्याचा उद्देश
⚡बांदा ता.२३-: आजच्या काळात जरी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्या तरी अनेक महिला या गृहिणी म्हणुनच दिसत आहेत. या महिलांना त्यांच्या पंखांना बळ मिळावे या उदात्त हेतूने ग्रामपंचायत माजगांव सहकार्याने व कोकण संस्थेच्या वतीने साबण बनविणे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. दोन दिवशीय शिबिराला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमवेळी सरपंच डॉ. सौ. अर्चना सावंत, उपसरपंच संतोष वेजरे, ग्रामसेवक संदीप गोसावी, ग्रामपंचायत सदस्या माधवी भोगण, विशाखा जाधव, प्रशिक्षक सुभाष बांबूळकर, कोकण संस्थेच्या वतीने कार्यक्रम समन्वयक समीर शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षणामध्ये आंघोळीचे साबण, कपड्याचे साबण, डिटर्जंट पावडर, लिक्विड सोप, फिनेल इत्यादी प्रकार प्रात्यक्षिक सहित शिकवण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये ४५ महिला सहभागी झाल्या होत्या.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत यांनी महिलांना व्यवसाय कसा करावा, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी यासाठी कोकण संस्था आपल्याला नेहमीच सहकार्य करेल असे सांगितले. यावेळी सरपंच डॉ. सावंत यांनी प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या व ग्रामपंचायतच्या वतीने यापुढेही उद्योजकता वाढीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे कोकण संस्थेने दिलेल्या प्रशिक्षणाचे कौतुकही केले.
हे प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, बचत गट, सौ. स्नेहा माजगांवकर, सौ. स्नेहा साळगांवकर यांचे सहकार्य लाभले. कोकण संस्थेच्या वतीने प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत, समन्वयक समीर शिर्के, समन्वयक सौ. भावना साटम यांनी योग्य नियोजन केल. प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते कोकण संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
