बेड रेस्ट रुग्णांसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा संयुक्त उपक्रम

सावंतवाडी, ता. १५: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे एम.बी.बी.एस डॉ. हर्ष सागावकर आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी शहर मर्यादेत राष्ट्रीय उपशामक काळजी कार्यक्रम (National Palliative Care Programme) राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे.
हा कार्यक्रम भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राबविला जाणारा महत्त्वपूर्ण आरोग्य कार्यक्रम आहे. गंभीर किंवा दीर्घकालीन आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना वेदना कमी करण्यासाठी, लक्षणांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारून सुसह्य जीवन जगण्यासाठी आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. यासाठी आपला दवाखाना स्टाफ श्रीमती तृप्ती अंधारी,यशवंत परब, गंगा सुतार आणि गायत्री वारंग हे सहकार्य करणार आहेत.
ही वैद्यकीय सेवा रुग्णांच्या शारीरिक वेदना, मानसिक ताण व इतर त्रास कमी करून त्यांना शक्य तितके आरामदायी व सन्मानपूर्वक जीवन जगण्यास मदत करणारी असून ही सेवा रुग्णालयात अथवा रुग्णाला रुग्णालयात आणून किंवा रुग्णाच्या घरी जाऊन दिली जाणार आहे.
यामध्ये कर्करोग, एचआयव्ही ग्रस्त रुग्ण, पक्षाघात, अल्झायमर, पार्किन्सन, स्मृतिभ्रंश, थॅलेसेमिया, सिकलसेल सारखे आजार असणारे रुग्ण, तसेच गंभीर बालरोग व मज्जासंस्था विकारांनी ग्रस्त मुले आणि दीर्घकालीन व गुंतागुंतीच्या आजाराने त्रस्त व्यक्ती यांचा प्राधान्याने उपचारासाठी विचार केला जाणार आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे डॉ. हर्ष सागावकर यांनी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक व सेवाभावी कार्यात तळमळीने काम करणारी संघटना म्हणून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सहकार्याने या योजनेचा लाभ बेड रेस्ट रुग्णांना देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी या संदर्भातील रुग्णांची यादी आवश्यक आहे त्यानुसार दर दिवशी दोन पेशंट तपासले जाणार आहेत.
यासंदर्भात सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक,कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, सचिव समीर खलील, रवी जाधव, रुपा मुद्राळे -गौंडर, हेलन निबरे आणि शेखर सुभेदार यांच्याशी सविस्तर चर्चा करून लवकरात लवकर सावंतवाडी शहरातील बेड रेस्ट गरजू रुग्णांना या सेवेचा लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले.
तरी सावंतवाडी शहरातील अशा स्वरूपाच्या दीर्घकालीन आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी व त्यांच्या कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सावंतवाडी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क- रवी जाधव 9405264027
रूपा मुद्राळे 9422633971
समीरा खलील 9890714614
