⚡सावंतवाडी ता.१५-: तहसीलदार कार्यालय, सावंतवाडी तथा एनएसएस युनिट, यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने भोसले नॉलेज सिटी येथे मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात दोन्ही महाविद्यालयांतील १८ वर्षे पूर्ण झालेल्या एकूण २६८ विद्यार्थ्यांनी नवमतदार म्हणून नोंदणी केली.

लोकशाही प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढविणे आणि पात्र विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासह तहसीलदार कार्यालयातील निवडणूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी प्रक्रिया पार पडली.
या शिबिरामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या ॲपद्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यात आली. नवमतदारांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच मतदानाचे महत्त्व आणि लोकशाहीतील नागरिकांची भूमिका याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरले.
