पुलाच्या जोडरस्त्याचे काम सुरू झाल्याने वाहनचालकात समाधान

बांदा/प्रतिनिधी
बांदा दाणोली रस्त्यावरील वाफोली धरणाजवळ नव्याने बांधकाम केलेल्या पुलाच्या जोडरस्त्याचे काम आजपासून सुरु करण्यात आल्याने वाहनचालकातून समाधान व्यक्त होत आहे. यासंदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी पुलाच्या मधोमध बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
श्री आईर यांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले होते.
निवेदनात म्हटले होते की, वाफोली धरणाजवळ नाबार्ड योजनेतर्गत ७५ लाख रुपये खर्चून पूल उभारण्यात आले आहे. गतवर्षी मार्च अखेरीस पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. पुलाच्या जोडरस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याचे काम अंदाजपत्रकात समाविष्ट असूनही ठेकेदार काम करण्यासाठी टाळाटाळ करत आहे. यामुळे रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून वाहनचालकांना गाडी चालविताना कसरत करावी लागत आहे. याठिकाणी छोटे मोठे अपघात झाले असून खड्डेमय रस्त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
आपल्या कार्यालयाकडून ठेकेदाराला येत्या आठ दिवसात उर्वरित काम पूर्ण करण्यासंदर्भात तात्काळ सूचना द्याव्यात अन्यथा याठिकाणी बसून उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी आईर यांची भेट घेत तात्काळ काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आजपासून कामास प्रारंभ करण्यात आला.
आंबोली ते गोवा जाण्यासाठी हा जवळचा रस्ता असल्याने या मार्गावर वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते.
फोटो :-
वाफोली येथे पुलाच्या जोडरस्त्याचे काम आजपासून सुरु करण्यात आले. (छायाचित्र – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page